ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेतील दुसर्या सामन्यांत रविवारी(२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी भारताचा पराभव करून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा हा वनडे मालिकेतील सलग दुसरा पराभव ठरला. या आधीच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघाकडून ३-० अशी हार पत्करली होती.
गेल्या ५ एकदिवसीय सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाला आता गोलंदाजांच्या अपयशाची चिंता सतावते आहे. वनडे सामन्यांत विजयी होण्यासाठी संघाला चांगली सुरुवात मिळणे महत्त्वाचे असते. मात्र भारतीय गोलंदाज, विशेषतः वेगवान गोलंदाज पहिल्या पॉवरप्लेच्या षटकांमध्ये (१ ते १० षटकांमध्ये) बळी पटकाविण्यात तसेच धावा रोखण्यात देखील सातत्याने अपयशी ठरत आहेत. मागील ५ सामन्यांतील आकडेवारी हेच चित्र स्पष्ट करते आहे.
भारतीय संघाने ह्या वर्षीच्या प्रारंभी न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना हॅमिल्टनच्या मैदानावर खेळविण्यात आला होता. या सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी पॉवरप्लेत ५१ धावा दिल्या होत्या, मात्र एकही गडी त्यांना बाद करता आला नाही. मालिकेतील ऑकलंड येथे झालेल्या दुसर्या सामन्यांत देखील भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवरप्लेच्या षटकांत ५२ धावा तर माऊंट मांगुनाई येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यांत तब्बल ६५ धावा दिल्या. याही सामन्यांमधे भारतीय गोलंदाजांना पहिल्या १० षटकांत बळी पटकाविण्यात यश आले नाही.
हीच गोष्ट ऑस्ट्रेलिया दौर्यावर देखील कायम असल्याचे दिसून येत आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांत भारतीय गोलंदाजांविरूद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अनुक्रमे ५१ आणि ५९ धावा लुटल्या. डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच या दोन्ही सलामीवीरांना पहिल्या दहा षटकांच्या आत तंबूत धाडणे, भारतीय गोलंदाजांना जमले नाही. परिणामी दमदार सुरुवात मिळाल्याने दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने धावांचे डोंगर उभारत भारतीय संघाचा पराभव केला.
येत्या वनडे सामन्यांमध्ये ही पराभवाची मालिका खंडित करायची असल्यास भारतीय संघाला पॉवरप्लेमधील गोलंदाजांची कामगिरी सुधारण्याची नितांत गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसर्या वनडेसाठी टीम इंडियामध्ये या ३ खेळाडूंना मिळू शकते संधी, तर खेळाडूंना मिळू शकतो डच्चू
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
‘त्याला’ गोलंदाजी दिल्याने योजनेचा खुलासा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराटचे भाष्य