ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज नेमबाज हिना सिद्धूने सुवर्णवेधी कामगिरी केली आहे. तिने २५ मी एअर पिस्तूल क्रिडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल २०१८ चे हे तिचे दुसरे पदक आहे.
याआधी तिने १० मी एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. तिची अंतिम फेरीत ८ नेमबाजांशीं लढत होती. यात तिने अंतिम फेरीत ३८ पॉईंट्स मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एलेना गेलियाबोविचने ३५ पॉईंट्स मिळवून रौप्य पदक तर मलेशियाच्या आलिया सज़ाना आझारीने २६ पॉईंट्स मिळवत कांस्य पदक मिळवले.
भारताच्या खात्यात आतापर्यंत ११ सुवर्णपदके, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदके अशी एकूण २० पदके आहेत.
हिनाचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच वयक्तिक सुवर्णपदक आहे. तिने २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १० मी एअर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक तर वयक्तिक रौप्य पदक मिळवले होते. मात्र तिला २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अपयश आले होते.
त्याचबरोबर तिने २०१७ मध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पिअनशिपमध्ये वयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली होती. याचबरोबर तिने जितू रायच्या साथीने २०१७ मध्ये १० मी एअर पिस्तूल प्रकारात मिश्र दुहेरीत ३ सुवर्णपदकेही जिंकली आहेत. यात आयएसएसएफ विश्वचषक, दिल्ली, आयएसएसएफ विश्वचषक रायफल/ पिस्तूल मालिका आणि अझरबैजान आणि आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरी या स्पर्धांचा समावेश आहे.
याचबरोबर तिने १० व्या आशियाई चॅम्पिअनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. तिने २०१३ च्या आयएसएसएफ विश्वचषकात विश्वविक्रम रचत सुवर्णपदकही मिळवले होते. तसेच ती पिस्तूल शूटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी भारताची पहिली महिला पिस्तूल नेमबाज ठरली होती.
तिला २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
https://twitter.com/Maha_Sports/status/983642997169557504