पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत झेकियाच्या जिरी वेस्लीने लिथुआनियाच्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याचा पराभव करत खळळजनक निकालाची नोंद केली तर बेलारूसच्या आठव्या मानांकीत एगोर गेरासीमोव्ह याने ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जेम्स डकवर्थचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत 3 तास 3 मिनिट चाललेल्या सामन्यात 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या झेकियाच्या जिरी वेस्ली याने लिथुआनियाच्या 29 वर्षीय जागतिक क्रमांक 73 असलेल्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याचा 6-7(8), 7-6(3), 7-6(7) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अतितटीचा संघर्षपुर्ण झालेला सामना तीन सेटचा झाला तिनही सेट बाराव्या गेमपर्यंत 6-6 अशा बरोबरीत राहील्याने टायब्रेक झाले. दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीपासुनच सामन्यावर आपली पकड घट्ट ठेवली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गेममध्ये आपली सर्व्हिस राखली. पहिला सेट बेरँकीसने 6-7(8) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट टायब्रेकमध्ये जिरी वेस्लीने 7-6(3) असा जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.
तिसरा सेटही बाराव्या गेमअंती ६-६ असा बरोबरीत झाल्याने टायब्रेक झाला व तिसरा सेट जिरी वेस्ली याने 7-6(7) असा जिंकून संघर्षपुर्ण लढतीत 6-7(8), 7-6(3), 7-6(7) असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. 2019 च्या यूएस ओपन दरम्यान जेव्हा वेस्ली आणि बेरेनकीसच यांच्यात लढत झाली. त्यावेळी लिथुआनियन स्टार बेरेनकीसने पाच सेटच्या सामन्यात वेस्लीचा पराभव करत आगेकुच केली होती. पुन्हा सहा महिन्यांनंतर झालेल्या या सामन्यात वेस्लीने विजय संपादन केला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत 1 तास 31 मिनिट चाललेल्या सामन्यात आठव्या मानांकीत जागतिक क्रमांक 90 असलेल्या 27 वर्षीय बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याने ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जागतिक क्रमांक 96 असलेल्या 28 वर्षीय जेम्स डकवर्थ याचा 7-6(2), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पहिला सेट बाराव्या गेमअंती 6-6 असा बरोबरीत झाल्यानंतर टायब्रेकमध्ये एगोरने बाजी मारत पहिला सेट 7-6(2) असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये आठव्या गेमपर्यंत सामना 4-4 असा बरोबरीत असताना एगोरने आपल्या खेळात परिवर्तन करत नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत दहाव्या गेममध्ये जेम्सची सर्व्हिस ब्रेक करून दुसरा सेट 6-4 असा जिंकत सामन्यात विजय मिळवला व अंतिम फेरीत प्रवेश केला. झेकियाच्या जिरी वेस्ली याच्याशी एगोर गेरासीमोव्हची विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
दुहेरीच्या दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिच व बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की या तिस-या मानांकीत जेडीने भारातच्या
रामकुमार रामनाथन व पुरव राजा यांचा 7-6(3), 6-4 असा पराभव करत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट-उपांत्य फेरी।
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि रिकार्डस बेरँकीस (लिथुआनिया)(2) 6-7(8), 7-6(3), 7-6(7)
एगोर गेरासीमोव्ह (बेलारूस)(8) वि.वि जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया)(6) 7-6(2), 6-4
दुहेरी गट- उपाेंत्य फेरी।
जोनाथन एर्लिच (इस्त्राईल) / आंद्रे वासिलेव्हस्की (बेलारूस) (3) वि .वि रामकुमार रामनाथन(भारत)/ पुरव राजा(भारत) 7-6(3), 6-4