भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशच्या गहुंजे, पुणे येथे होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोनही संघ १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील रविवारचा तिसरा सामना हा अंतिम व निर्णायक सामना आहे. आयपीएलपुर्वी भारतीय संघ हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. यामुळे यात विजय मिळवून एकप्रकारे आयपीएलपुर्वी गोड शेवट करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.
या सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी भारत आणि इंग्लंड संघात नाणेफेक झाली. पाहुण्या इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच दोन्ही संघानी आपापली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. सध्या खऱाब फॉर्ममधून जात असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी कर्णधार विराट कोहलीने वेगवान टी नटराजनला संधी दिली आहे. यामुळे भारतीय संघात नटराजनसह शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार व प्रसिद्ध क्रिष्णा हे वेगवान गोलंदाज दिसतील. तर याचबरोबर कृणाल व हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडू खेळणार आहेत. यामुळे भारतीय संघात एकही पुर्णवेळ फिरकीपटू या सामन्यात दिसणार नाही.
दुसरीकडे इंग्लंड संघातही केवळ एक बदल करण्यात आला आहे. गोलंदाज टॉम करनला बाकावर बसवत मार्क वुडला स्थान देण्यात आले आहे.
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या वनडेसाठी इंग्लंड संघ-
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मालन, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड