चेन्नई। आयपीएल २०१८ मधील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात सलामीवीर फलंदाज शेन वॉटसन आणि सॅम बिलिंग्सने महत्वाची कामगिरी बजावली.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई समोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसन आणि अंबाती रायडूने(३९) आक्रमक सुरुवात केली होती. सुरवातीपासूनच फटकेबाजी करणाऱ्या वॉटसनला रायडूने चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून ७५ धावांची सलामी भागीदारी रचली. वॉटसनने १९ चेंडूत ४२ धावा केल्या. यात त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.
हे दोघेही बाद झाल्यावर सुरेश रैना(१४) आणि एमएस धोनी ही जोडी मैदानावर होती. पण रैनाला क्रॅम्प आल्याने त्याला धावा करताना त्रास होऊ लागला. त्यातच त्याने त्याची विकेट गमावली.
यानंतर चेन्नई संघाचा डाव धोनी आणि सॅम बिलिंग्स या दोघांनी सांभाळली. या दोघांनी धावफलक हालता ठेवताना ५४ धावांची भागीदारी रचली. खेळपट्टीवर ही जोडी स्थिर झालेली असताना धोनी २५ धावांवर बाद झाला.
यानंतर सॅम बिलिंग्सने आक्रमक खेळत चेन्नईला विजयाच्या समीप आणले. अखेर त्याला बाद करण्यात टॉम कर्रनला यश मिळाले. पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या आवाक्यात आला होता.
अखेर ड्वेन ब्रावो(११*) आणि रवींद्र जडेजाने(११*) बाकी धावा पूर्ण केल्या. जडेजाने १ चेंडू बाकी असताना षटकार ठोकत चेन्नईचा विजय निश्चित केला.
कोलकाताकडून टॉम कर्रन(२/३९), पियुष चावला(१/४९), सुनील नारायण(१/१७), कुलदीप यादव(१/२७) यांनी विकेट घेतल्या.
तत्पूर्वी कोलकाताने २० षटकात आंद्रे रसेलच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद २०२ धावा केल्या होत्या. कोलकाताची सुरुवात चांगली झाली होती पण त्यांनी नियमित कालांतराने विकेट गमावले त्यामुळे एका क्षणी कोलकाता संघ ५ बाद ८९ धावा असा संघर्ष करत होता.
पण त्यानंतर रसेलने सामन्याची जबाबदारी उचलत तब्बल ११ षटकार आणि १ चौकाराच्या साहाय्याने ३६ चेंडूत नाबाद ८८ धावांची खेळी केली. कोलकाताच्या बाकी बालंदाजांपैकी ख्रिस लिन(२२), सुनील नारायण(१२), रॉबिन उथप्पा(२९), नितीश राणा(१६), दिनेश कार्तिक(२६), रिंकू सिंग(२) आणि टॉम कर्रन(२*) यांनी धावा केल्या.
चेन्नईकडून शेन वॉटसन(२/३९), हरभजन सिंग(१/११), शार्दूल ठाकूर(१/३७) आणि रवींद्र जडेजा(१/१९) यांनी विकेट्स घेतल्या.