नवी दिल्ली। आयपीएल २०२० मधील १९ व्या सामन्यात एकही चेंडू न खेळता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच विराट जगातील कोणत्याही एका संघासाठी सर्वाधिक टी२० सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. विराटच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये एकूण १९७ सामने खेळण्याचा विक्रम झाला आहे तसेच अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
एकाच टी२० संघासाठी सर्वाधिक सामने
विराटने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १९७ सामने खेळताना ३७.७४ च्या सरासरीने ५९२६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके ठोकली आहेत. या विक्रमात विराटने इंग्लंडच्या काऊंटी क्लब सोमरसेटच्या जेम्स हिलड्रेथला मागे टाकले आहे. जेम्सने सोमरसेट संघासाठी एकूण १९६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३६९४ धावा केल्या आहेत. यासोबत तो विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर नॉटिंघमशायरच्या समित पटेलचे नाव आहे. समीतने १९१ सामने खेळताना ३६०१ धावा केल्या आहेत.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून धोनीने १८९ सामने खेळले आहेत. त्यात धोनीने ४२.६९ च्या सरासरीने ४३९८ धावा केल्या आहेत, तर पाचव्या क्रमांकावर चेन्नई संघाचाच फलंदाज सुरेश रैना आहे. त्याने १८८ सामने खेळले आहेत. यात त्याने ३३.९८ च्या सरासरीने ५३६९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२०च्या हंगामात रैनाने वैयक्तिक कारणाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.