आयपीएलचा १३ वा मोसम सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आयपीएलच्या या मोसमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. मागे प्रेक्षकांव्यतिरिक्त आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते का याच्यावरही चर्चा झाली होती.
तसेच जर आयपीएलचे आयोजन उशीरा जरी करायचे म्हटले तरी कोणत्या देशाचे खेळाडू उपलब्ध होऊ शकतात कोणते नाही, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तसेच जरी परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय झाला तरी अनेक गोष्टीचांही विचार करावा लागेल.
तसेच जर असे झाले तर प्रत्येक संघाला परदेशी खेळाडूंशिवाय फक्त भारतीय खेळाडूंसह ११ जणांचा संघ तयार करण्याचे आव्हान असेल.
जर असा विचार करायचा झाला तर रॉयल चॅलेंजर्सचा असा असू शकतो परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त ड्रिम ११ संघ –
सलामीवीर – पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल
पार्थिव बेंगलोर संघाकडून ३ मोसम आत्तापर्यंत खेळला आहे. तसेच त्याला अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. तसेच त्याने बेंगलोरकडून खेळताना आत्तापर्यंत ३२ सामन्यात ७३१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी घेऊ शकतो. त्याने यष्टीरक्षण करताना बेंगलोरकडून २३ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याला सलामीला देवदत्त पडीक्कल साथ देऊ शकतो. पडीक्कलल अजून आयपीएलमध्ये सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पडीक्कलने ट्वेंटी२० प्रकारातील आत्तापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यात त्याने तब्बल ६४.४४ च्या सरासरीने ५८० धावा केल्या आहेत. त्यामुळे बेंगलोरकडे पार्थिव आणि पडीक्कलचे सलामीसाठी चांगले पर्याय आहेत.
मधली फळी – विराट कोहली (कर्णधार), गुरकिरतमन सिंग, शिवम दुबे
बेंगलोरकडून पहिल्या मोसमापासून खेळणारा विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तर आहेच. पण तो बेंगलोरकडून सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू आहे. तसेच तो मागील अनेकवर्षे मधल्या फळीत फलंदाजी करत असल्याने त्याच्याकडे अनुभव आहे. त्याने बेंगलोर कडून १९२ सामने खेळले असून ३७.८९ च्या सरासरीने ५८३६ धावा केल्या आहेत. यात ५ शतकांचा आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट व्यतिरिक्त बेंगलोरकडे मधल्या फळीतील फलंदाजीसाठी गुरकिरतमन सिंग आणि शिवम दुबेचाही पर्याय आहेत. गुरकितमन सिंगने ३ सामने २०१९ च्या मोसमात बेंगलोरकडून खेळले आहेत. यात त्याने ९८ धाव केल्या आहेत. तसेच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३३ सामन्यात १८.३३च्या सरासरीने ४४०धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असलेला शिवम दुबेने आयपीएलमध्ये २०१९ च्या मोसमात बेंगलोर संघाकडून पदार्पण केले. त्याने ४ सामने खेळले असून ४० धावा केल्या आहेत. शिवमकडे गरज पडल्यास गोलंदाजी करण्याचीही क्षमता असल्याने बेंगलोरला फायदा होऊ शकतो.
अष्टपैलू – वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदर २०१८ पासून बेंगलोर संघाकडून खेळत आहे. फिरकी गोलंदाजी करणाऱ्या सुंदरकडे गरज पडल्यास फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. त्याने बेंगलोरकडून आत्तापर्यंत १० सामने खेळताना ६६ धावा केल्या आहेत. तर ८ विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाज – पवन नेगी, नवदीप सैनी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल
बेंगलोरकडे गोलंदाजी फळीत चांगले युवा भारतीय खेळाडूंचा पर्याय आहे. तसेच बेंगलोरसाठी फिरकीपटू युजवेंद्र चहल हे मुख्य अस्त्र आहे. त्याने बेंगलोरकडून २०१४ पासून खेळताना ८३ सामन्यात २२.८४ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. तो बेंगलोरकडून १०० विकेट्स घेणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे.
त्याच्याव्यतिरिक्त बेंगलोरकडे पवन नेगीचाही फिरकी गोलंदाजीसाठी पर्याय आहे. २०१७ पासून बेंगलोरकडून खेळणाऱ्या पवनने १७.४० च्या सरासरीने १८ डावात २० विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर फलंदाजी करतानाही त्याने १६ डावात १५६ धावा केल्या आहेत.
तसेच बेंगलोरकडे उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी हे वेगवान गोलंदाज आहेत. उमेशने २०१८ पासून बेंगलोरकडून खेळताना २५ सामन्यात २८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सिराज बेंगलोरकडून २० सामने खेळला असून त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. तर सैनीने १३ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या
लास्ट ओव्हर! भारताकडून गोलंदाजी करताना टी२०मध्ये शेवटचे षटकं जबरदस्त टाकणारे ५ खेळाडू
ओपनिंग पासून ते ११व्या नंबरपर्यंत फलंदाजी करणारे ३ महान फलंदाज, एक आहे भारतीय