मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने संघाने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात काही अप्रतिम झेल पाहायला मिळाले, पण सामन्यातील सर्वोत्तम झेलचा पुरस्कार जिंकला तो युवा चेतन सकारियाने. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या सकारियाने निकोलस पूरनचा अप्रतिम झेल घेतला.
सरकारियाने घेतला अप्रतिम झेल
झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सकडून दिपक हुडा १८ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर पूरन फलंदाजीसाठी आला. हे षटक ख्रिस मॉरिस टाकत होता. त्याने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर पूरनने पुलचा शॉट मारला. मात्र, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सकारियाने पळत डावीकडे हवेत उडी मारत दोन्ही हातांनी तो झेल घेतला.
यानंतर तिसऱ्या पंचांनी झेल घेतल्यानंतर जेव्हा सकारिया जमीनीवर पडला तेव्हा चेंडू मैदानाला लागला नाही ना, हे तपासले. पण सकारियाने अप्रतिमरित्या हा झेल पूर्ण केला असल्याचे आढळ्याने पूरनला एकही धाव न करता परत जावे लागले.
सकारियाची पदार्णातच छाप
सकारियाने या सामन्यातून राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याला या आयपीएल हंगामासाठी राजस्थानने लिलावात १.२० कोटींची बोली लावली होती. सकारियानेही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच पूरनचा झेलही घेतला.
https://twitter.com/bebaslachara_/status/1381635094163509249
पंजाबचा विजय
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत पंजाबच्या फलंदाजांना राजस्थाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पंजाबने २० षटकांत ६ बाद २२१ धावा केल्या होत्या.
त्यांच्याकडून कर्णधार केएल राहुलने ७ चौकार आणि ५ षटकारांसह ५० चेंडूत ९१ धावांची खेळी केली. तसेच दिपक हुडाने २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचबरोबर ख्रिस गेलने ४० धावांची खेळी केली. त्यामुळे पंजबाला २२१ धावा करता आल्या.
राजस्थानकडून चेतन सकारियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर ख्रिस मॉरीसने २ आणि परागने १ विकेट घेतली.
प्रतिउत्तरादाखल, २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला २० षटकांत ७ बाद २१७ धावा करता आल्या. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी ५ धावांची गरज होती. त्यावेळी शतकी खेळी करणारा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला. सॅमसनने ६३ चेंडूत ११९ धावा करताना १२ चौकार आणि ७ षटकार मारले.
त्याच्याव्यतिरिक्त राजस्थानचा अन्य कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा पार करु शकला नाही. जॉस बटलर(२५), शिवम दुबे (२३) आणि रियान पराग (२५) यांनी छोटेखानी आक्रमक खेळी केल्या. मात्र, यातील कोणाही सॅमसनला अधिक काळ साथ देऊ शकले नाहीत. पंजाबकडून अर्शदिपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने २ आणि रिली मेरेडिथने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: हा तर केदारच्या पुढचा निघाला! रियान परागने टाकलेला चेंडू पाहून तुम्हीही असेच म्हणाल