22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं एक भविष्यवाणी केली. डिव्हिलियर्सनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात खळबळ माजवू शकतील अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत.
एबी डिव्हिलियर्सला उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीर यशस्वी जयस्वालकडून खूप अपेक्षा आहेत. यशस्वीनं 600 पेक्षा जास्त धावा कराव्यात अशी त्याची इच्छा आहे. यशस्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. गेल्या हंगामात त्यानं राजस्थानसाठी 14 सामन्यात 48.07 च्या सरासरीनं 625 धावा केल्या होत्या.
22 वर्षीय यशस्वी जयस्वालनं अलीकडेच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. त्यानं दोन द्विशतकांसह 89.00 च्या सरासरीनं 712 धावा केल्या. त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. डिव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, “मी यशस्वीला खेळताना पाहण्यासाठी आतुर आहे. कसोटी फॉर्मेटमध्ये त्यानं आपली क्षमता सिद्ध केली. आता टी20 फॉरमॅटमध्ये प्रतिभा दाखवण्याची वेळ आली आहे.”
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “यशस्वीला इंग्लंड कसोटी मालिकेतून जो आत्मविश्वास मिळाला, तो आयपीएलमध्ये उपयोगी ठरेल. मला त्याच्याकडून दमदार फलंदाजीसह हंगामात किमान 500 पेक्षा जास्त धावांची अपेक्षा आहे. तो 600 च्या पुढेही जाऊ शकतो.”
यशस्वीशिवाय, डीव्हिलियर्सनं दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सचं नाव घेतलं, जो आयपीएलच्या आगामी हंगामात चांगली कामगिरी करू शकतो. स्टब्स आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल. तो याआधी मुंबई इंडियन्सकडून दोन हंगामात खेळला होता.
डिव्हिलियर्स म्हणाला, “स्टब्सची एसए टी-20 स्पर्धा खूप चांगली होती. गेल्या वर्षी तो फारसा फॉर्ममध्ये नव्हता. पण यावर्षी त्यानं आपला ठसा उमटवला. त्यानं आपण काय करू शकतो हे दाखवून दिलंय. तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो चेंडू जोरात मारतो. तो गोलंदाजीतही प्रभावी ठरू शकतो. तो ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं.” SA T20 च्या दुसऱ्या सत्रात स्टब्सनं 60.2 च्या सरासरीनं 301 धावा केल्या होत्या. याशिवाय तो यष्टिरक्षकही आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?
आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर; राशिद खानची मोठी झेप, सूर्यकुमारचं अव्वल स्थान कायम
Video : रोहित-हार्दिकमध्ये सर्वकाही ऑल इज वेल! एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल