भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) रविवारी (1 जानेवारी) 2023 वर्षातील पहिली बैठक झाली. मुंबईमध्ये झालेल्या या चर्चासत्रात बीसीसीआयने वनडे विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगबाबात (आयपीएल) महत्वाचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल खेळणे आवश्यक नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे. यावर आयपीएल फ्रॅंचायजी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए) हे दोघे मिळून काम करतील. बीसीसीआयने त्यांचा निर्णय तर सांगितला, मात्र यावर आयपीएल फ्रॅंचायजीचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊ.
भारत 2023च्या वनडे विश्वचषकाचे आयोजक आहेत. त्यामुळे खेळाडूंचे वेळापत्रक आणि दुखापती यावर निर्णय घेण्यासाठी एनसीए आणि आयपीएल फ्रॅंचायजी मिळून काम करतील असे बीसीसीआयने झालेल्या चर्चासत्रात ठरवले. यावर आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्या अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, “कोणत्या खेळाडूंना विश्रांती द्यावी हे बीसीसीआयने फ्रॅंचायजींना सांगू नये. त्यांना आम्ही त्या खेळाडूंविषयी माहिती देऊ, मात्र त्यांनी खेळाडूंनी किती सामने खेळावे, किती फलंदाज-गोलंदाजी करावी हे ठरवू नये.”
बैठकीत बीसीसीआयने दुखापतीतून सावरलेल्या भारताच्या मुख्य खेळाडूंनी आयपीएल 2023च्या हंगामातील काही सामने विश्रांती घ्यावी असे सुचविले होते. भारतीय खेळाडूंची दुखापत पाहिली तर रोहितबरोबर दीपक चाहर, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा असे अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होते. आता ते फिट होण्याच्या मार्गावर असून लवकरच संघपुनरागमन करतील.
या चर्चासत्रात भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समितीचे चेतन शर्मा हे उपस्थित होते. यामध्ये भारताच्या 2022मधील प्रदर्शनाबाबत चर्चा केली गेली.
भारताने 2013मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारत अनेकदा विजेतेपदाला मुकला आहे. आता 2023चा विश्वचषक भारताच होणार असल्याने संघाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. भारताने 2011मध्ये दुसरा वनडे विश्वचषक जिंकला होता.
(IPL franchises upset on BCCI Player workload decision)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेकडून भारत 7 वर्षापूर्वी घरात टी20 मालिका हरलेला, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स
VIDEO: आऊट ऑर सिक्स? ऑस्ट्रेलियन खेळाडूने सीमारेषेवर पकडला आश्चर्यकारक झेल