क्रिकेटजगत आणि सिनेसृष्टी हा भारतीय रहिवास्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या विषय आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडचे नातेही खूप जवळचे आहे. कित्येक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. तर बऱ्याच क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही क्रिकेटपटूंनी स्वत: चित्रपटात अभिनयही केला आहे. याच रांगेत आता भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणचे नाव जोडले गेले आहे.
इरफानने कोब्रा नामक तामिळ चित्रपट साइन केला असून या चित्रपटाची शूटींगदेखील पूर्ण केली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध तामिळ अभिनेता चियान विक्रम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुक्रवारी (८ जानेवारी) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला आहे. यूट्युबवर फार कमी वेळेत या चित्रपटाच्या टीझरने धुमाकूळ घातला आहे. एकाहून एक जबरदस्त हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्ददर्शक अजय गमामुत्थु यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
जेव्हा भारतीय क्रिकेट रसिकांना इरफान अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे, याची चाहूल लागली. तेव्हापासून सर्वजण या चित्रपटाची डोळ्यात तेल घालून वाट पाहात होते. गतवर्षी २९ ऑक्टोबर रोजी इरफानने आपल्या अभिनयाचा पहिला लूक चाहत्यांपुढे आणला होता. त्यादिवशी इरफानचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने त्याने चाहत्यांना ही शानदार भेट दिली होती. त्यावेळी चाहत्यांनीही इरफानला नव्या कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.
कोब्रा चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, इरफान या चित्रपटात एका तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा व्यक्ती चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रम याच्या मागे लागलेला असतो. अभिनेता विक्रम या चित्रपटात एका गणितज्ञाची भूमिका साकारत आहे. या दोघांव्यतिरिक्त अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
इरफान पठाणची क्रिकेट कारकिर्द
इरफानने २००३ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. दरम्यान त्याने १२० वनडे सामन्यात १५४४ धावा आणि १७३ विकेट्स घेतल्या आहेत. तर २९ कसोटी सामन्यात ११०५ धावा आणि १०० विकेट्सची कामगिरी केली आहे. शिवाय टी२० क्रिकेटमध्येही त्याने २४ सामन्यात १७२ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच आयपीएलमध्ये १०३ सामने खेळले असून ११३९ धावा आणि ८० विकेट्सची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनी कसोटीत चेतेश्वर पुजाराने ठोकले २६ वे अर्धशतक, पण ‘हा’ नकोसा विक्रमही केला
ऑस्ट्रेलियन खेळाडूने सिडनी कसोटीत शुबमनला डिवचले; तरीही म्हणाला, “मी काही वाईट बोललो नाही”
आजारपणातही काळजी कर्तव्याची! हॉस्पिटलमध्ये असताना सौरव गांगुलीने केलं होतं ‘हे’ काम