बेंगळुरू | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये बेंगळुरू एफसीची शुक्रवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर एफसी पुणे सिटीविरुद्ध लढत होत आहे. सलग पाच विजयांच्या विक्रमी कामगिरीसह बेंगळुरूने बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की केले आहे, पण घरच्या मैदानावर विजयी फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार कायम असेल.
पुणे सिटी सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या पाच सामन्यांत त्यांनी चार विजय नोंदविले आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर असून बेंगळुरूपेक्षा पाच गुणांनी मागे आहेत. दोन्ही संघांचे सामने समान 15 झाले आहेत.
दोन्ही संघ आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी एकूण 57 गोल नोंदविले आहेत. बेंगळुरूने 30, तर पुण्याने 27 गोल केले आहेत. बेंगळुरूने मात्र इतके वर्चस्व राखले आहे की हरले तरी त्यांच्या अव्वल क्रमांकाला धक्का लागणार नाही. पुण्याच्या मार्सेलिनीयोने आठ, तर बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्री याने नऊ गोल केले आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात या दोघांतही छोटी लढाई रंगेल.
पुणे सिटीचे सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजिच यांनी सांगितले की, आम्हाला उद्या अव्वल क्रमांकासाठी प्रयत्न करण्याची संधी असेल. आम्ही काय करू शकतो आणि काय करण्याची गरज आहे याची कल्पना आहे. येथे जिंकल्यास आम्ही पहिल्या चार संघांमधील स्थान नक्की करू शकतो.
ते पुढे म्हणाले की, बेंगळुरूचा संघ शेवटचा सामना कधी हरला हे मला आठवत सुद्धा नाही. या घडीला त्यांची क्षमता आणि आत्मविश्वास एकदम उच्च पातळीवर आहे. बेंगळुरूविरुद्ध पहिल्या टप्यातील सामन्यात एक खेळाडू लाल कार्डमुळे कमी होईपर्यंत आम्ही वर्चस्व राखले होते. आम्हाला हे लक्षात ठेवून आत्मविश्वासाने खेळावे लागेल.
त्या सामन्यात बेंगळुरूची 3-1 अशी सरशी झाली होती. त्यामुळे वर्चस्व कायम राखण्यासाठी बेंगळुरू आतूर असेल. बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अल्बर्ट रोका म्हणाले की, विजयी लय कायम राखणे आणि आघाडीवर राहणे हे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्याद्वारे कामगिरी आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवून द्यावे लागेल. आघाडीवर असल्याची कल्पना असल्यास कामगिरी उंचावण्याची मानसिकता दाखविणे सोपे नसते, पण गाफील राहिल्यास इतर संघ तुम्हाला फटका देऊ शकतात, याचे कारण त्यांना तुमचे आघाडीवरील स्थान हवे असते.