चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (15 डिसेंबर) चेन्नईयीन एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ तळात असले तरी थोडी प्रतिष्ठा कमावण्याचे लक्ष्य गाठण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे.
दोन्ही संघांना यंदाच्या मोसमात झगडावे लागले आहे. दिल्लीला 11 सामन्यांत एकही विजय मिळविता आला नसून चार गुणांसह त्यांचा शेवटचा दहावा क्रमांक आहे. चेन्नईयीनला 11 सामन्यांत एकमेव विजय मिळाला असून पाच गुणांसह गतविजेते नवव्या क्रमांकावर आहेत. प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी तीन गुण जिंकून आत्मविश्वास उंचावण्याची संधी त्यांना आहे.
दोन्ही संघांना संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले आहे. त्यांचे स्ट्रायकर्स झगडत आहेत. चेन्नईयीनच्या जेजे लालपेखलुआ आणि कार्लोस सालोम यांना मिळून एकच गोल करता आला आहे. दिल्लीचा स्ट्रायकर अँड्रीया क्लाऊडेरोविच याला सुद्धा एकच गोल करता आला आहे.
चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, दिल्लीचा संघ प्ले-ऑफसाठी आव्हान निर्माण करू शकला असता. ते सामन्यांवर वर्चस्व गाजवित आहेत, पण बऱ्याच संधी दवडत आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात बरेच साम्य दिसेल.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही प्रशिक्षकांनी यंदा मोहीमेत जान येण्याच्या आशेने 19 आणि 20 खेळाडूंना संधी दिली आहे, पण त्यानंतरही निकालांमध्ये सुधारणा झालेली नाही.
ग्रेगरी यांना मोसमात इतक्या लवकर जेतेपद राखण्याच्या आशा संपुष्टात आल्याचा खेद वाटतो. त्यांनी संघाच्या प्रेरणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, आयएसएलमध्ये कोणत्याही संघाला अद्याप जेतेपद राखता आलेले नाही याचे मला नवल वाटते. आमचा मोसम असा सरकेल असे वाटले नव्हते. कदाचित जेतेपद राखण्याची तेवढी इच्छाशक्ती संघांकडे नसावी. आम्ही यंदा प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही असे दिसते. त्यामुळे आम्ही फार मोठी संधी दवडली आहे.
चेन्नईयीनला मैदानावरील कोणत्याच भागात अपेक्षित खेळ करता आलेला नाही हे जास्त धक्कादायक आहे. चेंडूवर बराच ताबा ठेवूनही त्यांना केवळ आठ गोल नोंदविता आले आहेत. सर्वांचे लक्ष लालपेखलुआ याच्यावर असेल. पुढील महिन्यातील आशियाई करंडकापूर्वी त्याला फॉर्म मिळविणे गरजेचे आहे.
दुसरीकडे दिल्लीनेही आशा उंचावून अखेरीस निराशाच केली आहे. आकर्षक शैलीचा खेळ करूनही त्यांना अपेक्षित निकाल साध्य करता आलेले नाहीत. गेल्या तीन सामन्यांत आघाडी घेऊनही त्यांनी नंतर ती घालवली आहे आणि अखेरीस तीन गुण घालवले आहेत.
दिल्लीचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांनी सांगितले की, आम्ही चांगला खेळ करीत आहोत. आम्ही अनेक संधी निर्माण करीत आहोत, पण गोल होत नाहीत. हीच समस्या आहे. आम्हाला गोल पत्करावे लागत आहेत. त्यामुळे बचावात सुधारणा करावी लागेल. आम्ही अवे सामन्यांतही संधी निर्माण करीत आहोत, पण अपेक्षित निकाल न मिळणे निराशाजनक आहे. आम्ही वर्षातील अखेरचा सामना जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरू.
गोम्बाऊ यांना अॅड्रीय कॅर्मोना याच्याशिवाय खेळावे लागेल. त्याला दुखापत झाली आहे. याशिवाय नारायण दास हा सुद्धा चार यलो कार्डसमुळे खेळू शकणार नाही. स्पेनच्या गोम्बाऊ यांच्यासाठी आणखी एक बाब चिंतेची आहे. लालीयनझुला छांगटे, रोमीओ फर्नांडीस आणि नंदकुमार शेखर या तिन्ही विंगरना अद्याप एकही अॅसिस्ट नोंदविता आलेला नाही.
चेन्नईयीन मोसमात घरच्या मैदानावर प्रथमच जिंकणार की दिल्ली निराशाजनक निकालांची मालिका संपविणार याची उत्सुकता असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा
–निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार
–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!