गोवा :हिरो इंडियन सुपर लिगमध्ये आक्रमक खेळ करणाऱ्या एफसी गोवा संघाला घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीने उपांत्य फेरीतील पहिल्या टप्यात पिछाडीवरून 1-1 असे बरोबरीत रोखले. याबरोबरच चेन्नईने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर गोल (अवे गोल) नोंदवित महत्त्वाची कामगिरी साध्य केली.
उत्तरार्धात गोव्याने मॅन्युएल लँझारोटेच्या गोलमुळे खाते उघडले होते. त्यानंतर चेन्नईने सात मिनिटांत बदली खेळाडू अनिरुद्ध थापा याच्या गोलसह बरोबरी साधली. दुसऱ्या टप्यातील सामना चेन्नईत येत्या मंगळवारी (दिनांक 13 मार्च) होईल. त्यात गोव्याला निर्णायक विजय अनिवार्य असेल.
गोव्याने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. अथक प्रयत्न करणाऱ्या मंदार राव देसाई याने 64व्या मिनिटाला डावीकडून आगेकूच केली. त्याने इनिगो कॅल्डेरॉनला चकविले आणि फेरॅन कोरोमिनासला पास दिला. कोरोमीनासने मारलेला चेंडू चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग याला नीट अडविता आला नाही. त्याच्या हाताला लागून आलेला चेंडू लँझारोटेने नेटमध्ये अलगद मारला.
चेन्नईने 71व्या मिनिटाला बरोबरी साधली. ग्रेगरी नेल्सन याने मध्य भागातून थापाला पास दिला. थापाने अचूक अंदाज घेत फटका मारला. समोर सहकारी आल्यामुळे गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी चकला. चेंडू त्याच्या पायाखालून नेटमध्ये गेला.
भरपाई वेळेत चेन्नईचा कर्णधार हेन्रीक सेरेनो याने गोव्याच्या मार्क सिफ्नेऑसला पाठीमागून पाडले. याबद्दल त्याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. याविषयी हुज्जत घातल्याबद्दल मैल्सन आल्वेस यालाही कार्डला सामोरे जावे लागले. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंत बाचाबाची झाली.
त्याआधी पुर्वार्धात दोन्ही संघांनी चांगले प्रयत्न केले, पण गोलशून्य बरोबरी झाली. तिसऱ्याच मिनिटाला चेन्नईच्या फ्रान्सिस्को फर्नांडीसने पेनल्टी क्षेत्रात घोडदौड करीत चेंडू मारला, पण गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने तो सहज अडविला. पुढील मिनिटाला मंदार राव देसाई याने डावीकडून आगेकूच केली, पण त्याने कोरोमीनासला दिलेल्या पासमध्ये अचूकता नव्हता. त्यामुळे चेंडू कोरोमीनासच्या पायाला लागून बाजूला गेला.
पाचव्या मिनिटाला नारायण दासने भक्कमपणे चेंडू तिरकस मारला. चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग याने तो अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो चकला. अशावेळी जेरी लालरीनझुलाने बचाव केला.
आठव्या मिनिटाला फर्नांडीसने आगेकूच करीत जेजे लालपेखलुआ याला पास दिला. जेजेने चेंडूवर ताबा व्यवस्थित मिळविला, पण त्याने मारलेला चेंडू नेटसमोरून गेला. 18व्या मिनिटाला मंदारने आगेकूच केली, पण त्याने मारलेला चेंडू जवळ असल्याने करणजीत सहज अडवू शकला. 21व्या मिनिटाला जेरीने बॉक्समध्ये दिलेल्या पासवर फर्नांडीसला आक्रमक फटका मारता आला नाही.
दोन मिनिटांनी बॉक्सच्याबाहेर जेरीने फ्री-किकवर मारलेला चेंडू थेट कट्टीमनीकडे गेला.
26व्या मिनिटाला मंदारने पुन्हा आगेकूच केली. त्याने डावीकडून मारलेला चेंडू कोरोमीनासच्या मागे गेला, पण धनपाल गणेशने वेळीच दक्षता दाखविली. 28व्या मिनिटाला कोरोमीनासने डावीकडून घोडदौड करीत नेटच्या दिशेने फटका मारला, पण चेंड मैल्सन आल्वेस याच्या टाचेला लागून चेन्नईसाठी सुरक्षित ठिकाणी गेला.
निकाल :
एफसी गोवा : 1 (मॅन्युएल लँझारोटे 64)
बरोबरी विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (अनिरुद्ध थापा 71)