पुणे : हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात प्रवेश करताना एफसी पुणे सिटीवर एक नामुष्की आली होती. लीगच्या इतिहासात कधीही बाद फेरी गाठू न शकलेल्या दोन संघांमध्ये पुणे सिटीचा समावेश होता.
नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या जोडीला ते होते. यंदा याच पुणे सिटीने सर्बियाच्या रँको पोपोविच यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा कलंक पुसून टाकत बाद फेरीपर्यंत विक्रमी धाव घेतली.
अॅकॅडमी, मार्केटिंग, चाहत्यांशी नाते अशा क्षेत्रांत प्रारंभीच गुंतवणूक केलेल्या आयएसएल क्लबमध्ये पुणे सिटीचा समावेश होता. कागदावर भक्कम वाटणारा हा संघ त्यांना साजेसे निकाल मात्र कधीच साधू शकला नव्हता.
यंदाच्या मोसमात सुमारे चार महिन्यांत पुणे सिटीने हा अपशकून संपवित प्रथमच बाद फेरी गाठली. याचे बरेचसे श्रेय पोपोविच यांना द्यावे लागेल. आयएसएलच्या तिसऱ्या मोसमात लक्षवेधी ठरलेले काही खेळाडू करारबद्ध करण्याचा चाणाक्षपणा पुणे सिटीने दाखविला हे खरे आहे.
यात दिल्ली डायनॅमोजला उपांत्य फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेला गोल्डन बुट विजेता मार्सेलिनियो व मार्कोस टेबार आणि नॉर्थईस्टचा एमिलियानो अल्फारो यांनी पुणे सिटीचा मार्ग धरला. मोसमपूर्व खेळाडू निवडप्रक्रियेत पोपोविच यांचा काहीच सहभाग नव्हता. त्यानंतरही पोपोविच यांनी सर्वांधिक प्रभाव पाडला.
स्टॅलीयन्स या विशेषणाने ओळखल्या जाणाऱ्या पुणे सिटीने अँटोनिओ हबास यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले होते. गेल्या मोसमातील प्रशिक्षकपद त्यांच्याकडे कायम होते.
परदेशी खेळाडूंच्या निवडीपासून जुलै 2017 मध्ये स्थानिक खेळाडूंच्या निवडीसाठी धोरण आखण्यापर्यंतची सुत्रे हबास यांच्याकडे होती. मोसमापूर्वी संघनिवडीत आपल्या कल्पनांना वाव मिळावा अशी कोणत्याही प्रशिक्षकाची अपेक्षा असते.
पोपोविच यांच्याबाबतीत तसे घडू शकले नाही. याचे कारण पुणे सिटीने हबास यांच्याबरोबरील करार अचानक संपविल्यानंतर पोपोविच दाखल झाले.
मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वीच प्रशिक्षकांच्या बाबतीत संकटात सापडलेल्या क्लबचे आव्हान अनेक जण नगण्य ठरविणे स्वाभाविक असते. त्यातच पुणे सिटीची सुरवात कुणालाही आवडू नये अशीच झाली. दिल्ली डायनॅमोजविरुद्ध तीन गोल पत्करावे लागल्यानंतर अखेर पुणे सिटीने दोन गोल केले.
पुढील सामन्यात मात्र पोपोविच यांनी ठसा उमटविला. गतविजेत्या एटीकेवर त्यांनी 4-1 असा सनसनाटी विजय साकार केला. या कामगिरीमुळे त्यांना प्रतिसाद मिळू लागला.
मोसमादरम्यान पोपोविच यांचे डावपेचात्मक कौशल्य आणि खेळाडूंच्या निवडीतील अचूकता अनेक वेळा दिसून आली. याचे उदाहरण म्हणजे घोडदौड करणाऱ्या बेंगळुरू एफसीची आपल्या मैदानावर कोंडी करणे त्यांनी शक्य करून दाखविले.
यंदा हेच इतर संघांना अवघड ठरले होते. बलजीत साहनीला लाल कार्ड मिळेपर्यंत पुण्याची पकड होती.
आदिल खान याला मध्य फळीत खेळविण्याचा त्यांचा निर्णय सुद्धा फलदायी ठरला. मोहन बागानच्या या माजी बचावपटूने मैदानाच्या मध्यभागी टेबार याच्या साथीत अप्रतिम खेळ केला.
त्यामुळे संघाला स्थैर्य आणि ताकद प्राप्त झाली. परिणामी अल्फारो, मार्सेलिनियो आणि दिएगो कार्लोस यांच्या आघाडी फळीला मोकळीक मिळू शकला.
मुख्य म्हणजे पोपोविच यांनी वैविध्यपूर्ण क्षमता असलेल्या खेळाडूंचा खुबीने वापर करून घेतला. बलजीत, रोहित कुमार, आदिल आणि सार्थक गोलुई अशा खेळाडूंना त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत संघाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी खेळविले.
पोपोविच यांचा तरुण खेळाडूंच्या क्षमतेवरील विश्वास हा सुद्धा पुण्याच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रशिक्षक तरुणांना संधी देताना साशंक असतात, पण पोपोविच यांचे धोरण तसे नाही. त्यांच्या धोरणाला फळ मिळाले.
गोलरक्षक विशाल कैथ (वय 21), गोलुई (20), इसाक वनमाल्साव्मा (21), आशिक कुरनियान (20), रोहित (21) आणि साहिल पन्वर (18) या तरुणांनी मोसमातील वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले.
पोपोविच म्हणाले की, बहुतांश खेळाडू भारताच्या राष्ट्रीय संघासाठी पर्याय बनावेत तसेच लीगचा दर्जा भक्कम व्हावा असे आम्हाला वाटते.
पोपोविच यांनी त्यांना मिळालेल्या खेळाडूंचा सर्वोत्तम वापर करून घेतला. त्यानंतर ट्रान्सफर विंडोमध्ये मार्को स्टॅन्कोविच आणि लोलो यांना मिळवित संघाच्या कामगिरीत आणखी सुधारणा केली.
पुणे सिटीला गेल्या तीन सामन्यांत केवळ दोन गुण मिळविता आले. त्यामुळे उपांत्य फेरीत बेंगळुरू एफसीविरुद्ध भरपाई करण्यास पुणे सिटी आतूर असेल. बेंगळुरूला अनेकांनी संभाव्य विजेता ठरविले आहे, पण यास पोपोविच अपवाद असतील. बेंगळुरूविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात ते व्यस्त आहेत. कदाचित त्यांच्याकडे बेंगळुरूला चकविणारा हुकमाचा एक्का असू शकेल.