मुंबई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील मुंबई फुटबॉल एरीनावर मुंबई सिटी एफसीची जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
मुंबईने पाचव्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीविरुद्ध दोन गुणांची आघाडी घेतली आहे, पण मुंबईचा एक सामना जास्त झाला आहे. त्यामुळे मुंबईला विजयाची नितांत गरज असेल. मुंबईचे अखेरचे दोन सामने कडव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आहेत. एफसी गोवा आणि चेन्नईयीन यांच्याविरुद्ध त्यांना खेळायचे आहे. अशावेळी जोर्गे कोस्टा यांच्या मुंबईला जमशेदपूरविरुद्ध अधिकाधिक फायदा उठविणे महत्त्वाचे आहे.
कोस्टा यांनी सांगितले की, आम्हाला जमशेदपूरच्या क्षमतेविषयी आदर बाळगावाच लागेल. मोसमातील तीन सामने बाकी आहेत. आम्ही अकारण जास्त गोष्टी बदलल्या नाहीत. आम्ही तसे करणार नाही. काही वेळा छोटे बदल करावे लागतात, पण आम्ही डावपेचांबाबत ठाम राहू. आम्हाला तीन गुणांची गरज आहे. एक गुण जरी गमावला तरी ते आमच्यासाठी प्रतिकूल ठरेल. आमच्यासमोरील दोन्ही पर्याय जिंकण्याचे आहेत. त्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही.
मुंबईने घरच्या मैदानावर अलिकडेच फॉर्म मिळविला असून त्याचा फायदा होईल अशी त्यांची आशा असेल. मागील दोन्ही सामने त्यांनी जिंकले, तसेच गोलही पत्करला नाही. त्यांचा बचाव भक्कम होत आहे. गेल्या तीन सामन्यांत त्यांच्याविरुद्ध एकच गोल झाला आहे.
रॉलीन बोर्जेस याच्यासारखे खेळाडू महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. रॉलीनमध्य फळीतून सामन्याचे नियंत्रण करीत आहे. कामगिरीला कलाटणी देणारा खेळाडू मात्र दिएगो कार्लोस ठरला आहे. अलिकडे त्याचा खेळ अप्रतिम होत आहे. त्याने नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध केलेला गोल निर्णायक ठरला. या विंगरला आता पुन्हा एकदा कामगिरी उंचावण्याची गरज असेल. मोडोऊ सौगौ हा निलंबनामुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे कार्लोसवरील जबाबदारी वाढली आहे.
जमशेदपूरची बाहेरील सामन्यांतील कामगिरी अलिकडे खालावली आहे आणि ही मुंबईच्या जमेची बाब असेल. अँटोनिओ इरीओंदो यांच्या संघाने असे तीन सामने गमावले आहेत.
मागील सामन्यात जमशेदपूरला एटीकेविरुद्ध 0-3 असे पराभूत व्हावे लागले. 16 गुणांसह त्यांचा सातवा क्रमांक आहेत. बाद फेरीच्या शर्यतीमधील त्यांच्या आशा अद्याप संपलेल्या नाहीत. गुरुवारी जिंकल्यास मुंबई व त्यांच्यातील गुणांचा फरक सातवरून चारपर्यंत कमी होईल.
इरीओंदो यांच्या संघाला पारडे फिरविण्यासाठी कामगिरीत चैतन्य निर्माण करण्याची गरज असेल. सर्जिओ कॅस्टेल आणि न्यो अकोस्टा अशा खेळाडूंना आघाडीवर धडाका दाखवावा लागेल. मध्य फळीतील पिटी दुखापतीमधून सावरून पुनरागमन करू शकतो.
इरीओंदो यांनी सांगितले की, आम्हाला केवळ गोल करायचे आणि जास्त संधी निर्माण करायच्या आहेत. आम्हाला संधींचे गोलमध्ये रुपांतर करण्याची गरज आहे. चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी नव्हे तर गोलच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही सरावात प्रयत्नशील आहोत.
जमशेदपूरसाठी बचाव चिंतेचा ठरला आहे. खराब बचाव आणि भरपूर गोल पत्करावे लागणे समस्या ठरल्या आहेत. टिरीच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला आहे. तो नसताना दोन सामन्यांत आठ गोल पत्करावे लागले आहेत. यातील बहुतांश गोल बचावातील चुकांमुळे झाले.
इरीओंदो यांनी सांगितले की, मुंबईच्या संघात भारतीय आणि परदेशी खेळाडूंमध्ये चांगला समन्वय आहेत. मोडोऊ या चांगल्या परदेशी खेळाडूशिवाय त्यांना खेळावे लागेल, पण त्यांच्याकडे चांगले पर्यायी खेळाडू आहेत. त्यांचा संघ सुसंघडीत आहे. काही त्रुटी असतील तर आम्ही त्या शोधण्याचा प्रयत्न करू.