---Advertisement---

मुंबई सिटी एफसीचा रेकॉर्ड! सलग 16 सामन्यांत अपराजित अन् मोडला सर्वाधिक गोल्सचा विक्रम

Mumbai-City-FC
---Advertisement---

हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये मुंबई सिटी एफसीने आज ऐतिहासिक कामगिरी केली. हिरो आयएसएलच्या एका पर्वात सलग १६ सामन्यांत अपराजित राहणारा तो पहिला संघ ठरला. शिवाय त्यांनी हिरो आयएसएलच्या एका पर्वात सर्वाधिक ४६ गोल्सचा एफसी गोवाचा ( २०१९-२०) विक्रम मोडला. ०-१ अशा पिछाडीवरून मुंबई सिटी एफसीने २-१ अशा फरकाने जमशेदपूर एफसीला पराभूत केले. मुंबई सिटीने यंदाच्या पर्वात आतापर्यंत ४७ गोल केले आहेत. या पराभवामुळे जमशेदपूर एफसीच्या प्ले ऑफच्या आशाही संपल्यात जमा झाल्या आहेत.

आजच्या लढतीपूर्वी पर्वातील पहिली मॅच १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यंदाच्या पर्वात अपराजित मुंबई सिटी विरुद्ध गुण मिळवणारा जमशेदपूर हा एकमेव संघ आहे. त्यामुळे आजची लढत सोपी नक्की नसेल, याची जाण मुंबई सिटीला होती. १५व्या मिनिटिला ऋत्विक दासच्या पासवर जमशेदपूरच्या डॅनिएल चुक्वूने गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट गोलरक्षक फुर्बा लाचेंपाच्या हातात गेला. यजमानांकडून सातत्याने आक्रमण सुरू होते. २२ व्या मिनिटाला ऋत्विकचा आणखी एक प्रयत्न ऑफ टार्गेट राहिला. मुंबई सिटीच्या बचावफळीत आज उणीव जाणवत होत्या. २४व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने माजी संघ जमशेदपूरला तणावात टाकले होते. ग्रेग स्टीवर्टने चेंडू चतुराईने लालिआंझुआला छांग्टेकडे दिला. त्यानंतर तो जॉर्ज डियाझकडे जाण्यापूर्वी जमशेदपूरचा गोलरक्षक रेहेनेश टीपीने त्यावर ताबा मिळवला.

३२व्या मिनिटाला ऋत्विक व चुक्वू यांच्याकडून झालेला प्रयत्न मुंबई सिटीच्या गोलरक्षकाने चतुराईने रोखला. इथे यजमानांनी जवळपास आघाडी घेतलीच होती. ३६व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टचा प्रयत्न थोडक्यात गोलमध्ये जाता जाता राहिला. पहिल्या हाफमध्ये जमशेदपूरकडून ३ ऑन टार्गेट प्रयत्न झाले, मुंबईकडून एकही प्रयत्न झाला नाही. पण, चेंडू सर्वाधिक वेळ मुंबईने खेळवला. जमशेदपूरने दुसऱ्या हाफमध्येही वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळाले. ५८व्या मिनिटाला ऋत्विक दास गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु नशीबाची साथ त्याला मिळाली नाही. जमशेदपूरकडून सातत्याने गोलसाठी प्रयत्न होत होते आणि मुंबई सिटीवर दडपण वाढत होते. ६३व्या मिनिटाला अखेर जमशेदपूरने आघाडी घेतली. बॉरिस सिंगने मुंबई सिटीवरील वाढलेल्या दडपणाचा फायदा उचलताना अप्रतिम गोल करून १-० अशी आघाडी घेतली.

मुंबई सिटीने त्यानंतर तीन बदल केले अन् आक्रमणाची धार तीव्र करण्याचा डाव खेळला. ७१व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोलरक्षकाने अप्रतिम बचाव करून मुंबई सिटीला बरोबरी मिळवू दिली नाही. जमशेदपूरचा खेळ वरचढ राहिला. ७८व्या मिनिटाला ऋत्विकचा एक प्रयत्न अयशस्वी ठरल्याने मुंबईने सुटकेचा निश्वास टाकला.

लालिआंझुआला छांग्टेने मुंबई सिटीला आशेचा किरण दाखवला अन् ८०व्या मिनिटिला बिपिन सिंगच्या क्रॉसवर सुरेख गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ८६व्या मिनिटाला विक्रम प्रताप सिंगने अप्रतिम गोल करून मुंबई सिटीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मुंबई सिटीने ही आघाडी कायम राखताना ४२ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. (ISL: Mumbai City FC created record read here )

निकाल : मुंबई सिटी एफसी २ ( लालिआंझुआला छांग्टेने ८० मि., विक्रम प्रताप सिंग ८६ मि. ) विजयी वि. जमशेदपूर एफसी १ ( बॉरिस सिंग ६३ मि.).

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरू एफसी आणि चेन्नईयन एफसी सहाव्या स्थानाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भिडणार
सेव्हन अ साईड फुटबॉल | स्ट्रायकर्स १३ वर्षांखालील गटातून अंतिम फेरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---