चेन्नई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीची जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होईल. दोन्ही संघांचे मनोधैर्य उंचावले असून बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या निर्धाराने ते भक्कम कामगिरीसाठी प्रयत्न करतील.
चेन्नईयीन 15 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी चांगला आक्रमक खेळ केला आहे. दुसरीकडे जमशेदपूरने सहा सामन्यांत विजयापासून वंचित राहिल्यानंतर केरला ब्लास्टर्सला 3-2 असे हरवित आशा पल्लवित केल्या आहेत.
जमशेदपूरचे मुख्य प्रशिक्षक अँटोनीओ इरीओंदो यांनी सामन्याच्या महत्त्वाविषयी सांगितले की, पहिले तीन संघ पहिले तीन क्रमांक पटकावतील असे आता स्पष्ट दिसते. वस्तुस्थितीचा विचार केला तर एकच स्थान मिळू शकते. आम्हाला संधी आहे. खेळाडूंना दुखापती झाल्या असल्या तरी आम्ही संघर्ष करू. हा सामना जणू काही अंतिम फेरीसारखाच आहे.
चेन्नईयीन घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठविण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच सामन्यांत चेन्नईयीनचा एकच पराभव झाला आहे. त्यांनी 12 गोल केले आहेत. दुसरीकडे जमशेदपूरचे बाहेरच्या मैदानांवरील रेकॉर्ड फार खराब आहे. गेल्या मोसमापासून त्यांना असे केवळ दोन सामने जिंकता आले आहेत.
चेन्नईयीनने नवे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक खेळाचे तंत्र मिळविले आहे. त्यांच्याकडे सुत्रे असताना सहा सामन्यांत 12 गोल झाले आहेत. यात रॅफेल क्रिव्हेलारो आणि नेरीयूस वॅल्सकीस यांचा वाटा मोलाचा राहिला आहे. वॅल्सकीस गोलांचा धडाका लावत असताना क्रिव्हेलारो कल्पक साथ देत आहे. कॉयल यांच्या कार्यकाळात ब्राझीलच्या क्रिव्हेलारोने 24 पासेस दिले असून लीगमध्ये तो या बाबतीत आघाडीवर आहे.
कॉयल यांनी सांगतिले की, जमशेदपूरचा संघ मोठी उंची गाठून येतो आहे. त्यांनी ब्लास्टर्सला हरविले आहे. आम्ही गोल करू शकलो हे महत्त्वाचे आहे. आम्ही धोकादायक आक्रमण करू शकतो हे दाखवून दिले आहे, पण आम्हाला थोडे संतुलन साधावे लागेल.
ते पुढे म्हणाले की, नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध आम्ही बऱ्याच संधी दवडल्या, पण यास आमचाच खेळ कारणीभूत आहे. आम्ही दोन गोल केले. आम्ही गोलांची संख्या वाढवली आहे, पण सुधारणेला अजूनही वाव आहे. आम्हाला आघाडीवर आणखी सफाईदार खेळ करावा लागेल. याचे कारण लवकर गोल केला तर आम्ही सामन्याचा निकाल आमच्याबाजूने नक्की करू शकतो.
जमशेदपूरला गेल्या सात सामन्यांत क्लीन शीट राखता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बचाव फळीविरुद्ध चेन्नईयीनला आक्रमणासाठी भरपूर वाव वाटू शकेल. त्याशिवाय जमशेदपूरला बचाव फळीचा आधारस्तंभ टिरी यास मुकावे लागेल. ब्लास्टर्सविरुद्ध त्याला दुखापत झाली.
इरीओंदो यांनी सांगितले की, चेन्नईयीनकडे आक्रमक खेळ करणारे उत्तम खेळाडू आहेत. त्यांनी प्रशिक्षक बदलला आहे. त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांची उर्जा वाढली आहे. टिरी नसल्याचे आम्हाला ठाऊक आहे, पण आम्ही ज्याची निवड करू तो चांगला खेळ करेल आमि आम्ही जिंकण्यासाठी संघर्ष करू.
सर्जिओ कॅस्टेल तंदुरुस्त होणे जमशेदपूरसाठी फार महत्त्वाचे ठरेल. तो नसताना त्यांच्या आक्रमणात जानच नव्हती. ब्लास्टर्सविरुद्ध त्याने बदली खेळाडू म्हणून उतरून पेनल्टीवर गोल केला. चेन्नईयीनविरुद्ध तो सुरवातीपासून खेळण्याची अपेक्षा आहे. कॅस्टेल नसताना जमशेदपूरला एकही सामना जिंकता आलेला नाही. यावरून इरीओंदो यांच्या संघासाठी त्याचे महत्त्व स्पष्ट होते.
फारुख चौधरी, न्यो अकोस्टा आणि ऐतोर मॉनरॉय असे खेळाडू चांगला खेळ करीत असल्यामुळे इरीओंदो यांना कॅस्टेल यास आघाडीला चांगली साथ मिळण्याची आशा असेल. बाहेरील सामन्यातील महत्त्वाच्या विजयासाठी ते आवश्यक आहे.