चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटसाठी खुप खास ठरणार आहे. या सामन्यादरम्यान तो एक खास विक्रम करेल.
शुक्रवारपासून सुरु होणारा कसोटी सामना हा रुटचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. तो १०० वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंडचा १५ वा खेळाडू ठरेल. विशेष म्हणजे केवळ ३० व्या वर्षीच रुट १०० वा सामना खेळण्याचा कारनामा करत आहे.
पदार्पणही भारतातच
रुटसाठी भारत हा नेहमीच खास देश राहिला आहे. रुटचे कसोटी पदार्पण देखील भारतात झाले आहे. त्याने नागपूर येथे सन २०१२ ला १३ ते १७ डिसेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याचे पदार्पणही धडाक्यात झाले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावा केल्या होत्या. हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना होता
विशेष म्हणजे २०१२ ची कसोटी मालिका इंग्लंडसाठी प्रचंड खास ठरली होती. या मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
याबद्दल रुट द हिंदूशी बोलताना म्हणाला, ‘भारतात आल्यानंतर हे एक वर्तुळ पुर्ण होण्यासारखे आहे. २०१२ साली माझ्या पहिल्या दौऱ्यापासून (भारत दौऱ्यापासून) हे सुरु झाले. माझ्यासाठी तो डोळे-उघडवणारा दौरा होता. फिरकी गोलंदाजी कशी खेळायची हे शिकलो, दिग्गज खेळाडूंबरोबर खेळलो आणि एका मजबूत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळलो होतो. त्यानंतर पुन्हा चेन्नईत येणे आणि माझा १०० वा कसोटी सामना खेळणे खास आहे. मी यासाठी उत्सुक आहे.’
रुटची भारताविरुद्ध कामगिरी –
रुटने भारताविरुद्ध आत्तापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ९ अर्धशतकांसह ५६.८४ च्या सरासरीने १४२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या १६ सामन्यांपैकी ६ सामने त्याने भारतात खेळले आहेत. त्यात त्याने ५३.०९ च्या सरासरीने ५८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
रुटची एकूण कसोटी कामगिरी –
रुटने त्याच्या कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळताना ४९.३९ च्या सरासरीने ८२४९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १९ शतकांचा आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! चेन्नई कसोटीपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे पडला बाहेर
हॅप्पी बर्थडे भुवी!! भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल जाणून घ्या १० खास गोष्टी
सलामीवीर-यष्टीरक्षक ठरले; गोलंदाजीची धुरा ‘या’ खेळाडूंकडे, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI