दिनांक १४ जानेवारीपासून गॉल येथे श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडकडून पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली. यासह त्यांने एक खास विक्रमही केला आहे.
रुटने या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात ३२१ चेंडूत २२८ धावा केल्या. या खेळीत त्याने १८ चौकार आणि १ षटकार मारला. याबरोबरच त्याने कारकिर्दीत ८००० कसोटी धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला. त्याने हा कारनामा या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (१६ जानेवारी) केला. यावेळी त्याचे वय ३० वर्षे १५ दिवस इतके होते. त्यामुळे तो कसोटीमध्ये ८००० धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा युवा क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने जॅक कॅलिसला मागे टाकत या यादीत तिसरा क्रमांक मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कॅलिसने ३० वर्षे १९३ दिवस इतके वय असताना कसोटीत ८००० धावांचा टप्पा पार केला होता.
कसोटीमध्ये सर्वात कमी वयात ८००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ऍलिस्टर कूकच्या नावावर आहे. कूकने २९ वर्षे १ दिवस एवढे वय असताना हा कारनामा केला होता. त्यापाठोपाठ या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने २९ वर्षे २४ दिवस इतके वय असताना कसोटीत ८००० धावांचा टप्पा पूर्ण केल्या होत्या.
कसोटीत ८००० धावा करणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू –
रुटने ९८ कसोटी सामन्यातील १७८ डावात फलंदाजी करताना त्याने ८०५१ धावा केल्या आहेत. त्याच्यापुर्वी ऍलिस्टर कूक, ग्राहम गूच, ऍलेक्स स्टिव्हर्ट, डेविड गोवर, केविन पीटरसन, जॉफरी बॉयकॉट या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी ८००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
इंग्लंडची भक्कम आघाडी –
रुटच्या द्विशतकाव्यतिरिक्त इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने ७३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडकडून पहिल्या डावात कोणत्याच फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या खालोखाल जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ४२१ धावांवर संपुष्टात आला. तत्पूर्वी श्रीलंका संघ पहिल्या डावात १३५ धावांवर सर्वबाद झाला असल्याने इंग्लंडने २८६ धावांची भक्कम आघाडी घेतली.
यानंतर तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात ६१ षटकात २ बाद १५६ धावा केल्या आहेत. कुशल मेंडिस(१५) आणि कुशल परेरा (६२) नाबाद खेळत आहेत.
कसोटीत सर्वात कमी वयात ८००० धावा करणारे क्रिकेटपटू –
२९ वर्षे १ दिवस – ऍलिस्टर कूक
२९ वर्षे २४ दिवस – सचिन तेंडुलकर
३० वर्षे १५ दिवस – जो रुट
३० वर्षे १९३ दिवस – जॅक कॅलिस
३१ वर्षे १४ दिवस – रिकी पाँटिंग
३१ वर्षे ५१ दिवस – ग्रॅमी स्मिथ
महत्त्वाच्या बातम्या –
लॉयनविरुद्ध आक्रमक फटका खेळून बाद झाल्यानंतर रोहितचे स्पष्टीकरण, म्हणाला…
पडद्यामागचा खरा नायक! हार्दिक-कृणालच्या वडिलांच्या त्यागाची कहाणी, वाचून व्हाल भावनिक
Video: श्रेयस अय्यरचा जीममधील ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल; लवचिकता पाहून तुम्हीही अचंबित व्हाल