इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. पहिल्या दिवसापासून भारत चांगल्या स्थितीत होता. त्यामुळे पहिला कसोटी सामना भारत जिंकेल, असे वाटत असतानाच पावसाने मात्र पूर्ण खेळावर पाणी फेरले. सामन्याच्या पाचव्या दिवशी एकही चेंडू न खेळता सामना अनिर्णित राहिला.
दरम्यान, इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोने दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. भारताकडे क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या स्वरूपासाठी गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कौशल्य आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९ विकेट घेतल्या, ज्यात पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या सामन्यात शेवट पर्यंत चांगल्या स्थितीत राहिला.
एका आभासी पत्रकार परिषदेत बोलताना बेयरस्टो म्हणाला, ‘बुमराह सोबत झालेले सर्व बातचीत तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, परंतु एवढे खरे की बुमराह एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.’ न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात बुमराह विकेट्स मिळवण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना गमावण्यामागे हे एक मोठे कारण असल्याचे म्हटले जाते, मात्र, बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ९ विकेट्स घेत तो लयीत परतला असल्याचे दाखवून दिले आहे.
पुढे बोलताना बेयरस्टो म्हणाला, “बुमराची ‘ऍक्शन’ आणि ‘रनअप’ थोडीशी वेगळी आहे. परंतु याचाच फायदा त्याला होतो. बुमराहने आतापर्यंत केवळ वीसच कसोटी सामने खेळले आहेत. मागील मालिका पाहिली तर त्यातील ६ तर केवळ इंग्लंड विरुद्ध खेळले आहेत. त्यामुळे अशावेळी खेळाडू विरोधी संघाविरुद्ध आपली लय पकडतो, त्याचबरोबर आपल्या कौशल्याचा वापर करत चांगली खेळी करतो.”
“तसेच आपण बुमराहची प्रशंसा केली पाहिजे. तो एक जागतिक स्तरावरचा गोलंदाज आहे. आपण आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहिले. त्याचबरोबर भारतासाठी एकदिवसीय असो व टी-२० किंवा कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच्या गोलंदाजीचे प्रदर्शन आपण पाहिलेच आहे,” असेही तो म्हणाला.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत विचारले असता, बेयरस्टो म्हणाला, “भारतीय गोलंदाजांविरुद्ध खेळणे हे पूर्णपणे मैदानावर अवलंबून आहे. त्याचबरोबर वातावरणात होणारे बदल देखील खेळण्यावर परिणाम करू शकतात. इथे नेहमीच वातावरण बदलत राहते. त्यामुळे कसे खेळायचे हे आधीच ठरवता येत नाही. मैदानात आल्यावर परिस्थितीला धरून खेळावे लागते. मागील सामन्यात ज्याप्रकारे खेळलो त्याच प्रकारे खेळण्याची शक्यता आहे. माझ्या खेळण्यात जास्त फरक दिसणार नाही.”
दरम्यान, बेयरस्टोने २०१२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बेयरस्टोने आतापर्यंत ७५ कसोटी सामने खेळले आहेत. मागील काही काळात बेयरस्टोने जास्त कसोटी सामने खेळले नाही.
महत्वाच्या बातम्या –
–ज्युनिअर तेंडुलकर करतोय आयपीएल पदार्पणाची जोरदार तयारी; सरावाचे व्हिडिओ केले शेअर
–“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा
–इंग्लंडचा २०१८ चा दौरा अपयशी ठरला, पण यंदा ‘हे’ ध्येय मनाशी पक्कं करुन आलोय, केएल राहुलने व्यक्त केला विश्वास