– शारंग ढोमसे
कोणताही खेळ म्हटला की वाद आलेच. मग ते खेळाडू खेळाडूंमध्ये असोत की पंच आणि खेळाडूंमध्ये किंवा प्रशिक्षक आणि पंचांमध्ये असोत. त्यात कबड्डी सारखा अत्यंत जलद खेळ असेल तर वाद अधिक प्रमाणात होतात. मुंबईत पार पडलेल्या मुंबई महापौर चषकाच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. त्या अनुषंगाने खेळाडूंनी पंचांशी हुज्जत घालणे योग्य की अयोग्य? पंच आपल्याकडे असेलेले अधिकार का वापरत नाहीत? काही खेळाडू किंवा प्रशिक्षक स्वतःला खेळापेक्षाही मोठे समजतात का? प्रो कबड्डीत दिसणारे अनुशासन स्थानिक स्पर्धांमध्ये का दिसत नाही? यांसारख्या सामान्य क्रीडा रसिकांना पडणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख. तत्पूर्वी हे नमूद करणे योग्य ठरेल की या लेखात मांडलेले मुद्दे अधिक स्पष्टपणे पोहचवण्यासाठी काही उदाहरणांचा वापर करणे अपरिहार्य ठरते. मात्र कोणत्याही खेळाडूंवर किंवा प्रशिक्षकांवर व्यक्तिगत टीका करणे या लेखाचा उद्देश नाही. कारण मुळातच त्यांच्याकडून घडणाऱ्या चूका या बहुतकरून परिस्थितीजन्य असतात, कोणीही त्या ठरवून करत नाही.
खेळाडूंनी पंचांशी हुज्जत घालणे योग्य की अयोग्य?
कोणत्याही खेळापेक्षा कबड्डी हा खेळ पंचांची अधिक सत्त्वपरीक्षा पाहणारा आहे यात कोणाला शंका नसावी. मुळातच हा खेळ वेगवान आहे. त्यात एखाद्या खेळाडूने विरोधी खेळाडूला केलेला अगदी अलगद स्पर्श किंवा बोनस रेषा नियमानुसार पार झाली किंवा नाही या गोष्टी टिपणे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत पंचांकडून थोड्याफार चूका होणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘पंचांचा निर्णय अंतिम’ या तत्वाला या खेळात विशेष महत्व देणे गरजेचे आहे. खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. अगदीच स्पष्ट चुकीचा निर्णय असला तर खेळाडूंनी निषेध नोंदवणे चुकीचे नाही मात्र असे करतांना खेळाडूंनी आपल्या मर्यादा ओलांडता कामा नये. त्यात पंचांविषयी अपशब्द काढणे किंवा अगदीच हमरीतुमरीवर येणे तर पूर्णपणे निषेधार्ह. खेळात आक्रमकता असणे ही गोष्ट चांगली मात्र त्याला योग्य वेळी मुरड घालणारा खेळाडूच खऱ्या अर्थाने मोठा खेळाडू असतो.
पंच आपल्याला असलेल्या अधिकारांचा वापर करण्यास का धजावत नाहीत?
हा मुद्दा प्रामुख्याने स्थानिक स्पर्धांमध्ये लागू होतो. स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडू कितीही आक्रमक झाले किंवा मर्यादा सोडून वागले तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याचे दिसत नाही. फार फार तर खेळाडूंना हिरवे कार्ड दाखवून त्यांना सूचना दिली जाते. अशा सूचना खेळाडू किती गांभीर्याने घेतात हा एक प्रश्नच आहे! पंचांना या बाबत असलेल्या अधिकरांचा विचार करणे येथे क्रमप्राप्त ठरते. खेळाडूच्या ‘आक्षेपार्ह वागणुकीसाठी’ पंच ‘पिवळे कार्ड’ दाखवू शकतात ज्यामुळे खेळाडूला २ मिनिटे मैदानाबाहेर जावे लागते. तर ‘लाल कार्ड’ दाखवल्यास खेळाडू त्या संपूर्ण सामन्याला मुकतो. एव्हढेच नव्हे तर एखाद्या खेळाडूला एकाच स्पर्धेत दोन लाल कार्ड दाखवण्यात आले तर तो खेळाडू स्पर्धेतूनच बाद होतो.
मात्र एव्हढे अधिकार असतांनाही पंच या अधिकारांचा वापर अभावानेच करतात. अर्थात हे अधिकार सढळ हाताने वापर करण्यासाठी नसतातच पण योग्य परिस्थितीतही त्यांचा वापर होणार नसेल तर त्या तर त्या अधिकारांचा काय उपयोग? आता पंच या अधिकारांचा वापर का करत नसावेत याची अनेक कारणे असू शकतात. त्यात प्रेक्षकांचं दडपण, ज्या खेळाडूंविषयी निर्णय द्यायचा आहे त्यांची लोकप्रियता, ज्या संघाविषयी निर्णय द्यायचा आहे त्या संघाचा किंवा प्रशिक्षक किंवा खेळाडूंचा कबड्डी वर्तुळातील दबदबा, मुळातच योग्य निर्णय घेण्याची क्षमतेचा अभाव, आपण कठोर निर्णय घेतल्यानंतर आयोजक किंवा संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील का या विषयीची संदिग्धता यांचा समावेश होतो. अर्थात, या सगळया गोष्टी सगळ्यांनाच लागू होतील असे नाही. कारण धाडसी आणि योग्य निर्णय देणारेही अनेक पंच आपल्याकडे आहेत .दाखलाच द्यायचा झाला तर नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नितीन मदने सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूलाही शासन करण्यात पंचांनी मागे पुढे बघितले नव्हते. मात्र असे निर्णय अभावानेच बघायला मिळतात ही वस्तुस्थिती. त्यामुळे पंचांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेऊन आपल्या अधिकारांचा वापर करणे अपेक्षित आहे!
खेळाडूंची जबाबदारी
खेळाडू कितीही मोठा असला तरी तो खेळापेक्षा मोठा कधीच नसतो या गोष्टीचे भान ठेवणे प्रत्येक खेळाडूसाठी अत्यंत गरजेचे आहे. खेळाचे नियम हे प्रत्येकासाठी सारखे असतात. त्यामुळे आपल्या नावाभोवती असलेले वलय, लोकप्रियता, मान, सन्मान खेळाडूने मैदानाच्या ४ रेषाबाहेरच ठेवून येणे अपेक्षित असते. पंचांनी दिलेल्या निर्णयाचं योग्य तो आदर खेळाडूनीं राखणे अपेक्षित असते. मात्र आवेशात येऊन खेळाडू आपला संयम गमावून बसतात आणि मर्यादा ओलांडतात खास करून पुरुषांच्या सामन्यात ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवते. अर्थात सगळेच खेळाडू असे असतात असे समजण्याचे काहीही कारण नाही. आक्रमक खेळ करूनही तितकाच शांत आणि संयमी वावर असणारे अनेक खेळाडू आपल्याकडे होते आणि आताही आहेत. इतर खेळाडूंनीही त्या खेळाडूंचा आदर्श घ्यावा. आणखी एक मुद्दा म्हणजे खेळाडूंचा प्रामाणिकपणा. प्रत्येक वेळी खेळाडूला स्पर्श झाला की नाही हे पंचांसाठी ठरवणे अवघड होऊन बसते. त्यामुळे खेळाडूंनी खेळाडूवृत्ती आणि प्रामाणिकपणाने या गोष्टी मान्य केल्या तर बरेच प्रश्न सुटतात. मात्र खेळाडूंचे काम खेळणे आहे आणि पंचांचे काम निर्णय देणे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्याला झालेला स्पर्श मान्य करायचा की नाही हा त्यांचा स्वविवेकी निर्णय आहे. जे खेळाडू अशा खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन करतात ते कौतुकास नक्कीच पात्र असतात हे मात्र नक्की.
पंचांची जबाबदारी
खेळाडूंनी ज्या प्रमाणे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे पंचांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी. कबड्डीतल्या सर्व नियमांविषयी अगदी बारकाईने अभ्यास असणे ही पंचांची प्राथमिक जबादारी आहे. अनेकदा पंच नियमांविषयी अनभिज्ञ आहेत असे दिसून येते. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मुंबई महापौर चषक स्पर्धेत महिला विभागाच्या अंतिम स्पर्धेत एक-दोन प्रसंगी नेमका काय निर्णय दयावा या विषयी पंच संभ्रम अवस्थेत दिसले. विशेषतः तांत्रिक गुण कोणत्या प्रसंगांमध्ये दिले जातात याविषयीचा गोंधळ दिसून आला. त्यामुळे पंचांना नियमांचे सखोल ज्ञान असावे आणि त्या ज्ञानाचे योग्य ते उपयोजन त्यांनी मैदानात करावे. आपण कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही संघ किंवा खेळाडू विषयी आकस किंवा ममत्व भाव न ठेवता तटस्थ राहूनच निर्णय देण्याचे भान पंचांनी बाळगावे आणि बहुतेक पंच ते भान बाळगतातही मात्र त्या टक्केवारीत वाढ व्हावी ही अपेक्षा!
संघटनेची दुहेरी भूमिका
पंचांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन पर शिबिरे आयोजित करणे आणि खेळाडूंना योग्य ते शासन करणे अशा दुहेरी भूमिकेत संघटनेने(अर्थात ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन’) काम करणे अपेक्षित आहे.
त्यातील पहिली भूमिका संघटना व्यवस्थित निभावते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र खेळाडूंना शासन करण्यात कुठेतरी संघटना कमी पडते हे वेळोवेळी जाणवते. पंचांशी हुज्जत घालणारे प्रसंगी त्यांच्या अंगावर चालून येणाऱ्या खेळाडूंवर कारवाई झाल्याची उदाहरणे मला तरी माहीत नाहीत, असली तरी ती अगदी दुर्मिळच असतील. त्यामुळे संघटनेने खेळाडूंवर योग्य ती कारवाई करून शिस्त घालून दिली पाहिजे जेणेकरून पंचांची प्रतिष्ठा कायम राहील.
एकूनच कबड्डीच्या सर्व घटकांनी आपली जबादारी योग्यरीत्या पार पडल्यास ‘वादात खेळ चाले’ असे म्हणण्याची वेळ कबड्डी रसिकांवर येणार नाही!
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा एमएस धोनी भरमैदानात चाहत्याला देतो त्रास…, पहा व्हिडिओ
–क्रिकेटमधील डक म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या..
–२२७ भारतीय क्रिकेटपटूंपैकी असा पराक्रम करणारा विराट चौथाच!