टी२० विश्वचषक २०२१ रोमांचक पार पडला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने-सामने होते. अंतिम सामन्याचे आयोजन दुबईस्थित दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर केले गेले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आणि न्यूझीलंड संघाचाच महत्वाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांनी या सामन्याच्या सुरुवातीलाच एक खास विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. या दोघांनी मैदानावर पाय टाकताच या विक्रमाची नोंद केली आहे.
केन विलियम्सन आणि ट्रेंट बोल्ट हे न्यूझीलंडचे दोन्ही क्रिकेटपटू, क्रिकेटच्या तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये (एकदिवसीय, कसोटी, टी२०) लागोपाठ आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे पहिले क्रिकेटपटू ठरले आहेत. टी२० विश्वचषकाच्या आधी खेळल्या गेलेल्या दोन आयसीसी स्पर्धांमध्येही त्यांनी न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आता रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यातही खेळल्यामुळे त्यांचा नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे.
दरम्यान, न्यूझीलंड यापूर्वी २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. यावेळी न्यूझीलंडच्या संघात केन विलियम्सन आणि ट्रेंट बोल्ट या दोघांचाही समावेश होता. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंड संघ विजयी ठरला होता, त्यावेळीही केन विलियम्सन आणि ट्रेंट बोल्ट ही जोडी मैदानावार दिसली होती.
आता टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसली आहे. कर्णधार केन विलियम्सनने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघासाठी महत्वाची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड मालिका सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट
बाबो! भारत-न्यूझीलंड संघाच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी स्टेडियमवर असणार ‘एवढ्या’ पोलिसांचा बंदोबस्त
खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मिताली राज झाली भावुक; म्हणाली, ‘मनापासून आशा आहे की…’