नागपूर। येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या रणजी उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे कर्नाटकने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्नाटकच्या कृष्णप्पा गॉथमने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.
मुंबईने दुसऱ्या डावात सर्वबाद ३७७ धावा केल्या. या डावात मुंबईकडून सूर्याकुमार यादव ने शतकी खेळी केली. त्याच्या बरोबरच आकाश पारकर आणि शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. परंतु पहिल्या डावातील हरकिरीमुळे मुंबईचा पराभव टळू शकला नाही.
यादवने शतकी खेळी करताना १८० चेंडूत १०८ धावा केल्या. यात त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. तो श्रेयश गोपालकरवी धावबाद झाला. तसेच आकाशने ६५ आणि शिवमने ७१ धावा केल्या. कर्णधार असणाऱ्या आदित्य तारेला मात्र एकही धाव करता आली नाही.
मुंबईकडून बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. पृथ्वी शॉ, जय गोकुळ बिस्त,अखिल हेरवाडकर,सिद्धेश लाड आणि धवल कुलकर्णी यांनी धावा केल्या.
कर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम(६/१०४), विनय कुमार (२/४५), श्रीनाथ अरविंद(१/४०) यांनी बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा
कर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ५७० धावा
मुंबई दुसरा डाव: सर्वबाद ३७७ धावा
सामनावीर:विनय कुमार
( पहिला डाव: ६ बळी, दुसरा डाव:२ बळी)