पुणे| केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या फेरीतील दुसर्या दिवशी डेक्कन इलेवन क फुटबॉल संघ,इंद्रायणी फुटबॉल संघ, पिफा फुटबॉल संघ आणि स्निगमय एफसी संघानी आपले विजय साकारत उपांत्यपुर्व फेरीत मजल मारली.
आजच्या दिवसाचा पहिला सामना हा डेक्कन इलेवन क फुटबॉल संघ विरुद्ध ब्लू स्टॅग फुटबॉल संघात झाला. हा सामना डेक्कन इलेवन क फुटबॉल संघाने 2-0 असा जिंकला. या सामन्यात डेक्कन इलेवन क फुटबॉल संघाच्या मिहीर जोशी याने 12 मीनिटाला पहिला गोल साकारला. त्यानंतर लगेचच त्याला साथ देत डेक्कन इलेवन क फुटबॉल संघाचा हेस्टर नारकोरा याने 45 मिनीटाला दुसरा गोल केला. या दोघांना वरूण वैद्य याने चांगले पास दिले. तर दुसरीकडे ब्लू स्टॅग फुटबॉल संघाचे फुटबॉलपटू शुभम जाधव आणि सचीन चंदेल यांनी चांगली कामगिरी करत गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र यांना एकही गोल करता आला नाही त्यामुळे हा सामना डेक्कन इलेवन क फुटबॉल संघाने 2-0 अशा एकूण गोल फरकाने जिंकला.
दुसरा सामना हा इंद्रायणी विरुद्ध परशूरामियन्स ब संघात रंगला. या सामन्यात इंद्रायणी संघाने 6-0 अशी बाजी मारली. या सामन्यात इंद्रायणी फुटबॉल संघाच्या सरोज यादव याने सामन्याच्या पहिल्या 5 मिनीटाला गोल मारला. तर लगेचच दुसरा गोल कुंदन सिंग याने 13 मिनीटाला तर जगतराज याने 24 मिनीटाला गोल साकारत इंद्रायणी संघाला आघाडीवर नेले. तर त्यानंतर इंद्रायणी संघाच्या करमेंद्र सरोज याने 37 मिनीटाला तर जगतराज याने पुन्हा 48 मिनीटाला तर करमेंद्र सरोज याने पुन्हा 52 मिनीटाला गोल करत इंद्रायणी संघाला तब्बल 6 गोल मारून दिले. तर परशुरामियन्स ब संघाच्या एकाही फुटबॉलपटूला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना 6-0 अशा एकतर्फी इंद्रायणी संघाने जिंकला.
तिसरा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात शिवाजीयन्स अ विरुद्ध पिफा फुटबॉल संघ आमने सामने आले होते. या सामन्यात शिवाजीयन्स अ फुटबॉल संघाचे तगडे आव्हान असताना पिफा सारख्या संघाने त्यांच्याशी अटीतटीचा खेळ करत गोलशुन्य बरोबरी राखली. दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये पिफा फुटबॉल संघाच्या जयवर्धन चव्हाण, योगेश बागुल, तपन मेहता, आदिश पांडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर दुसरीकडे शिवाजीयन्स अ संघाच्या आयुष शेट्टी, किहेशसिंग, यांनी प्रत्येकी 1 गोल केले. त्यामुळे हा सामना टायब्रेकरमध्ये पिफा फुटबॉल संघाने 4-2 असा जिंकला. शिवाजीयन्स अ संघाचा गोलरक्षक महारबाम रोमारीओ याने सर्वोत्तम गोलरक्षण केले. महारबाम रोमारीओ हा राष्ट्रीय गोलरक्षक आहे. तसेच त्याने खेलो इंडीयामध्ये चांगली कामगिरी साकारली आहे. तर पिफा फुटबॉल संघाचा गोलरक्षक राधेशाम याने चांगली कामगिरी करत संघाला विजयी केले.
चौथा सामना स्निगमय एफसी विरुद्ध अशोका इलेवन संघात रंगला. स्निगमय एफसी मुझफर शेख याने सामन्याच्या पहिल्या 10 मिनीटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. तर त्याला उत्तर देताना अशोका इलेवन संघाच्या सॅमसन सॅम्युअल याने 35 मिनीटाला पेनल्टीवर गोल करत बरोबरी केली. स्निगमय एफसी संघाच्या अमित गायकवाड याने 53 मिनीटाला दुसरा गोल करत सामन्यावर 2-1 असे वर्चस्व गाजविले. स्निगमय एफसी संघाचा गोलरक्षक शंकर कदम याने सर्वोतम कामगिरी केली तर याच संघाचा सुमित भंडारी याने मात्र शानदार पास दिले.
केसरी करंडकाचा संक्षिप्त निकाल
दिवस सहावा, दुसरी फेरी
1) डेक्कन इलेवन क फुटबॉल संघ विरुद्ध ब्लू स्टॅग : सकाळी 9 वाजता
निकाल : डेक्कन इलेवन क फुटबॉल संघाने 2-0 अशा एकूण गोल फरकाने जिंकला.
2) इंद्रायणी विरुद्ध परशूरामियन्स ब संघ
निकाल : इंद्रायणी संघाने 6-0 अशी बाजी मारली
3) शिवाजीयन्स अ विरुद्ध पिफा फुटबॉल संघ
निकाल : पिफा फुटबॉल संघाने 4-2 असा जिंकला.
4) स्निगमय एफसी विरुद्ध अशोका 11 संघ
निकाल : स्निगमय एफसी संघाने 2-1 असा जिंकला.
आजच्या आयोजित सामन्यांचे वेळापत्रक
उपांत्यपुर्व फेरी –
इंद्रायणी विरुद्ध पिफा फुटबॉल संघ : सकाळी 9 वाजता
परशूरामियन्स अ संघ विरुद्ध डेक्कन इलेवन क : 10.30 वाजता
फिनायक्यु विरुद्ध स्निगमय एफ.सी : दुपारी 1:00 वाजता
डेक्कन इलेवन अ संघ विरुद्ध एनवायएफए संघ : दुपारी 2.30 वाजता