गुवाहटी। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या तिरंदाजांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्यांनी दोन रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकांसह पाच पदकांवर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षी पुण्यातही महाराष्ट्राला पाच पदके होती. मात्र, त्यात दोन सुवर्णपदकांचा समावेश होता.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलात संपन्न झालेल्या तिरंदाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी २१ वर्षांखालील गटात रिकर्व्हमध्ये टिशा संचेती आणि सचिन वेदवान यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत टिशाला हरियानाच्या हिमानी आणि सचिनला राजस्थानच्या जगदीश चौधरीकडून ४-६ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. याच वयोगटात महाराष्ट्राच्या मयूर रोकडे याला ब्रॉंझपदकाची लढत गमवावी लागली. हरियानाच्या सनी कुमार याने त्याला ६-२ असे हरवले.
ईशा, पार्थ, साक्षीला ब्रॉंझ
पहिल्या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या ईशा पवार हिला या वर्षी १७ वर्षांखालील कंपाऊंड प्रकारात ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने मध्य प्रदेशाच्या लक्षिता फिरके हिचा १४४-१३९ असा पराभव केला. या वर्षी कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राला हे एकमेव पदक मिळाले.
याच वयोगटात रिकर्व्ह प्रकारात पार्थ साळुंकेने हरियानाच्या सागर शमार्चा ७-३ असा पराभव करून ब्रॉंझपदक मिळविले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात रिकर्व्हमध्ये साक्षी तोटे हिने ब्रॉंझपदकाची कमाई करताना गुजरातच्या परमिला बारिआ हिला ६-४ असे पराभूत केले.
राज्य संघाचे प्रशिक्षक ओंकार घाडगे यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. या वर्षी ईशा वगळल्यास सर्व खेळाडू नवे होते.त्यामुळे दडपणाचा सामना करण्यात ती कमी पडली. अर्थात पहिल्या प्रयत्नात हे असे होतच असते. त्यांच्यासाठी हे व्यासपीठ मोठे आहे. या स्पर्धेतून मिळालेला अनुभव त्यांच्यासाठी भविष्यात खूप महत्वाचा ठरणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राची ही गुणवत्ता २०२४ पर्यंत भारतीय संघापर्यंत पोचतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.