गुवाहटी। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात नेमबाजी, ज्युदो, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरेख कामगिरी केली. प्रत्येक खेळामध्ये आगेकूच करीत खेळाडूंनी पदकांची कमाई करीत आजचा दिवस गाजविला.
रुद्राक्ष पाटिलचा नेमबाजीत सुवर्ण वेध
महाराष्ट्राच्या नेमबाजांनी अन्य खेळाडूंचा कित्ता गिरवताना सुवर्णपदकाने सुरवात केली. स्पर्धेच्या १० मीट एअर रायफल मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ठाण्याच्या रुद्राक्ष पाटिलने सुवर्ण, तर २१ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या शाहू माने याने ब्रॉंझपदक मिळविले.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात रुद्राक्षने वर्चस्व राहिले. त्याने ६२७.२ गुणांनी अव्वल क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अंतिम फेरीतही सातत्य राखताना २५२.४ गुणांनी त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. गुजरातचा केवळ प्रजापती (२५०.५) रौप्य, तर राजस्थानचा मानवेंद्र शेखावत (२२६.७) गुणांसह ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात शाहू माने ६२१.१ गुणांसह पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अंतिम फेरीत बाद होताना त्याची आसामच्या हृदय हजारिकासह २२७.२ गुणांसह बरोबरी झाली होती. त्या वेळी शूट आऊटमध्ये तो मागे राहिला. त्यामुळे त्याला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
ज्युडोत तीन रौप्य व तीन ब्राँझ
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ज्युडोतही पदकांची लयलूट केली. २१ वषार्खालील मुलींमध्ये नागपूरची शुभांगी राऊत (५७िकलो) तर मुलांच्या २१ वषार्खालील गटात मुंबईचा प्रथम गुरव (५५ किलो) व कोल्हापूरचा निशांत गुरव (७३ किलो) यांनी रौप्यपदक पटकाविले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत शिकणाºया राणी खोमणे (४८ किलो) व स्नेहल खावरे (५२ किलो) यांनी ब्राँझपदक जिंकले तर कराडची रोहिणी मोहितेने याच वयोगटातील ४४ किलो विभागात ब्राँझपदक मिळविले.
टेबल टेनिसमध्ये मुलांच्या दुहेरीत शुभम व चिन्मय विजेते
महाराष्ट्राच्या शुभम आम्रे व चिन्मय सोमया यांनी २१ वषार्खालील मुलांच्या दुहेरीतील विजेतेपदाला गवसणी घातली. या जोडीने अंतिम फेरीत हरयाणाच्या जीत चंद्रा व वेस्ली दो रोझारिओ यांचा ११-५, १०-१२, ११-९, १३-११ असा पराभव केला. त्यांनी टॉपस्पीन फटक्यांचा बहारदार खेळ केला. दुसºया गेममध्ये हरयाणाच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. ही गेम त्यांनी घेत सामन्यात उत्कंठा निर्माण केली. चौथ्या गेममध्येही त्यांनी चिवट लढत दिली. तथापि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला आणि सोनेरी यशावर मोहोर नोंदविली.
दिया चितळेला सुवर्ण
महाराष्ट्राच्या दिया चितळे हिने १७ वर्षाखालील एकेरीत आपलीच सहकारी स्वस्तिका घोष हिला ७-११, ११-७, ११-८, ११-८, ९-११, ३-११, १४-१२ असे हरविले आणि विजेतेपद पटकाविले.
जिम्नॅस्टिक्समध्ये आदितीला सुवर्ण
जिम्नॅस्टिकमध्ये आदिती दांडेकर हिने तालबद्धच्या (रिदमिक) वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात ५२.९५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात रिचा चोरडिया ४७ गुणांसह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात कलात्मकच्या फ्लोअर एक्सरसाईजमध्ये अनस शेख याने १२.१० गुणांसह ब्रॉंझ पदकाची कमाई केली.