गुवाहटी। खेलो इंडिया युथ गेम्सच्या यंदाच्या तिस-या पर्वापासून समाविष्ट करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकाने सुरवात केली. कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने १७, तर मुंबईच्या मधुरा वायकर हिने २१ वर्षांखालील गटात अनुक्रमे १५ आणि २० कि.मी. रोड रेस शर्यतीत सुवर्णपदक मिळविले.
गुवाहटीपासून जवळपास ४० कि.मी. दूर असलेल्या सोनापूर हम रस्त्यावर ही शर्यत पार पडली. महाराष्ट्राचे सायकलपटू छाप पाडणार असा विश्वास सुरवातीलाच प्रशिक्षक दीपाली पाटील यांनी व्यक्त केला होता. तो त्यांच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. मुलांमध्ये अपयश आले असले, तरी मुलींनी त्याची भरपाई केली. सर्व प्रथम मधुराने २० कि.मी. अंतराची शर्यत ३० मिनीट ३६ सेकंद अशी वेळ देत जिंकली. या वेळी तीचा सायकलिंगचा वेग तब्बल ताशी ३९ प्रति कि. मी. इतका होता. तिने कर्नाटकाच्या मेघा गुगड (३१ मि. ०५ सेकंद), सौम्या अंतापूर (३१ मि.३३ सेकंद) यांना मागे टाकले.
मुलींच्या १७ वर्षांखालील अशी सोनेरी कामगिरी इचलकरंजीच्या पूजा दानोळे हिने केली. तिने १० कि.मी. अंतर ताशी ३७ कि.मी. वेगाने २४ मिनीट १८ सेकंद वेळात पार केले. तिने दिल्लीच्या लिआक्रेस एंजनो (दिल्ली), रीत कपूर (चंडिगड) या दोघींना मागे टाकले. एंजनो २४ मि.५९ सेकंद वेळेसह रौप्य, तर रीत २५.१८ सेकंद वेळेसह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
पूजा आणि मधुरा या दोघींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सायकलिंगमध्ये नाव कमावले आहे. एकवेळ सायकल घेण्याची आर्थिक स्थिती नसल्यामनुळे मधुराच्या वडिलांना आपले घर विकावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी आपल्या मुलीचा खेळाचा हट्ट पुरविला. यामुळेच मधुरा देखील आज जे काही मला यश मिळत आहे ते आई वडिलांच्या सहकायार्मुळेच मिळत असल्याचे मान्य करते. ते नसते, तर मी उभी राहू शकले नसते, असे ती सांगते. कारकिर्दीच्या सुरवातीपासून वडिलांनी तिच्या सरावाकडे आणि आईने तिच्या आहाराकडे लक्ष पुरविले. आजही ते दोघे तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.
आई वडिलांनी एक खेळ आणि अभ्यासाची निवड करायला सांगितल्यावर सुरवातीपासून बाईकचे वेड असणा-या मधुराने सायकलिंगची निवड केली. त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. दादरसारख्या क्रिकेट प्रेमी असलेल्या भागातून मधुरा मात्र सायकलची झाली. घरापासून ठाणे असा रोजचा ५० कि.मी.चा सायकल सराव करून तिने आतापर्यंत २२ राष्ट्रीय पदके मिळविली आहेत. कुमार गटात सलग दोन वर्षे विजेती राहण्याची कामगिरी तिने केली आहे. मधुरा केरमन फ्रामना यांच्याकडे प्रशिक्षण घेते.
पूजाची कहाणी काही वेगळी नाही. कुटुंबाचे तिला नुसतेच प्रोत्साहन नव्हते, तर कुटुंब क्रीडा प्रेमी असल्याचा तिला बोनस होता. वडिल आणि भाऊ कुस्तीपटू, काका जलतरणपटू असल्यामुळे तिला खेळाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले. ट्रायथलॉन, अॅक्वॅथलॉनमुळे पूजा सायकलिंगशी केवळ गेली चार वर्षे जोडली गेली. पण, या चार वर्षात ज्या स्पर्धेत सहभाग घेतला त्यात पदक मिळवून तिने आपली छाप पाडली आहे. आतापर्यंत तिच्या खात्यात १४ पदके असून, यात खेलो इंडियासह सात सुवर्णपदकांचा समावेश आहे.
पुण्यात दीपाली पाटिल यांच्याकडे दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यावर राष्ट्रीय शालेय स्पधेर्तील कामगिरीने तिची दिल्ली येथील साईच्या अॅकॅडमीसाठी निवड झाली. सध्या ती दिल्लीतच अनिल कुमार यांच्याकडेच ती मार्गदर्शन घेते. प्रशिक्षकच आपले आई वडिल असल्याचे ती सांगते. पूजाचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टिकोनही जबरदस्त आहे. पुढील वर्षी आशिया अजिंक्यपद स्पधेर्तील पदकाचे उद्दिष्ट तर आहेच. पण, मला ऑलिंपिक खेळायचे आहे, असे ती सांगते. वैयक्तिक परस्यूट हा तिचा हुकमी प्रकार असून तिने २०२४ आॅलिंपिकमध्ये सहभाग आणि त्या अनुभवानंतर २०२८ ऑलिंपिकमध्ये पदक असे उद्दिष्ट ठेवले आहे.