बंगळुरूमध्ये मागील आठवड्यात आयपीएल २०१८ साठीचा लिलाव पार पडला. या लिलावात सर्वात आक्रमक बोली लावताना दिसले ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे संघमालक.
या सुरवातीपासूनच आक्रमकपणे लावलेल्या बोलीमुळे यावर्षी पंजाब संघातून अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. परंतु या लिलावानंतर पंजाब संघासमोर समस्या उभी राहिली होती ती कर्णधारपदाची.
पंजाब संघाने अजूनही कर्णधाराचे नाव घोषित केले नसले तरी त्यांनी कर्णधार पदासाठी ५ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात युवराज सिंग, अक्षर पटेल, ख्रिस गेल, आर अश्विन आणि ऍरॉन फिंच हे खेळाडू आहेत.
यातील युवराजला पंजाब संघाच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने २००८ च्या पहिल्या मोसमात या संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले होते. तसेच ऍरॉन फिंचनेही ऑस्ट्रलिया संघाचे टी २० मध्ये नेतृत्व केले असल्याने त्याच्याकडेही बऱ्यापैकी कर्णधारपदाचा अनुभव आहे.
याबरोबरच पंजाब संघाचा कर्णधार म्हणून ख्रिस गेलचेही नाव पुढे येऊ शकते ते त्याच्या अनुभवामुळे. गेलने ट्वेन्टी २० मध्ये चांगलेच नाव कमावले असून त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने ट्वेन्टी २० मध्ये खेळताना ११ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण अश्विनलाही या कर्णधारपदाच्या शर्यतीत कमी लेखाता येणार नाही. त्याला नेतृत्वाचा अनुभव नसला तरी पंजाब संघ त्याला ती संधी देऊ शकते.
या कर्णधारपदासाठी जाहीर झालेल्या नावांमध्ये आश्चर्यकारक नाव म्हणजे अक्षर पटेलचे. त्यालाही कर्णधारपदाचा कसलीही अनुभव नाही पण तरीही पंजाब संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. तसेच पटेल हा पंजाब संघात लिलावापूर्वी कायम केलेला एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे आता या पाच जणांपैकी कोणाच्या डोक्यावर कर्णधाराचा मुकुट चढतो याची सर्वांना उत्सुकता आहे.
याबरोबरच यष्टिरक्षणाच्या जबाब्दारीचीही पंजाब संघाला समस्या भेडसावत आहे. त्यांच्याकडे केएल राहुल आणि अक्षदीप नाथ हे दोन यष्टिरक्षणासाठी पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या दोघांकडेही पुरेसा असा यष्टिरक्षणाचा अनुभव नाही.