आज बीसीसीआयने श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २ सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. त्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराटला आराम देण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे कर्णधार विराटला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ कसोटीनंतर आराम देण्याची दाट शक्यता आहे.
या बद्दल बोलताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले की ” विराट श्रीलंकेविरुद्ध कसोटीत खेळेल पण रोटेशन पोलिसी कर्णधारालाही लागू आहे. त्याचबरोबर आम्ही त्याचा ताण बघत आहे. तो आयपीएलपासून सातत्याने खेळात आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. जी आम्ही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर देण्याचा विचार करतोय.”
विराटने काल त्याची २०० वी वनडे सामना खेळला यात त्याने त्याचे ३१वे शतक करताना रिकी पॉंटिंगचा ३० शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. आता तो वनडेत सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर अजूनही ४९ शतकांसहित अव्वल स्थानावर आहे.