पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
बावधन येथील गंगा लिजेंड्स फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच लॅन्सर्स संघाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारले. 7व्या मिनिटाला लॅन्सर्सच्या अथर्व कुलकर्णी याने ऋषिकेश कुलकर्णी याने दिलेल्या पासवर गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर पॅलॅडियन्सच्या निखिल माळी, मयुरेश चव्हाण यांनी जोरदार चाली रचल्या, पण त्यांना त्याचे गोलात रूपांतर करण्यात अपयश आले. 12व्या मिनिटाला लॅन्सर्सच्या पृथ्वीराज सातवने मिळलेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाला पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धातही लॅन्सर्सच्या आघाडीच्या फळीने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवला. पिछाडीवर असलेल्या पॅलॅडियन्स संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला. निखिल गावडे, यश सरदेसाई यांचे आक्रमण लॅन्सर्सच्या गोलरक्षक नावेद शेख याने परतावून लावले. सामन्याच्या शेवटपर्यंत लॅन्सर्स संघाने आपली आघाडी कायम ठेवत पॅलॅडियन्स संघावर 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाला 50 हजार रूपये व करंडक व उपविजेत्या संघाला 25 हजार रूपये व करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरकर ज्वेलर्सचे प्रसाद नगरकर, कल्चर पुणेचे हर्ष करंदीकर, लोकमान्य बँक लिमिटेडचे शिरीष आळेकर, अभिषेक बोके आणि ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ऋषीकेश बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स: 2(अथर्व कुलकर्णी 7मि, पृथ्वीराज सातव 12मि) वि.वि टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स: 0; सामनावीर-नावेद शेख;
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट खेळाडू : पृथ्वीराज सातव(लॅन्सर्स);
गोल्डन बुट: पृथ्वीराज सातव(लॅन्सर्स);
उदयोन्मुख खेळाडू: धीरेन भतिजा(लॅन्सर्स);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: प्रणल शेट्टी(रेझरबॅक्स).