मुंबई । भारतीय क्रिकेटला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेणारा माजी कर्णधार एमएस धोनीने आपल्या चाहत्यांना शनिवारी एक धक्का दिला. धोनीने शनिवारी,15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यासह गेल्या एक वर्षापासून त्याच्या निवृत्तीबाबत सुरू असलेली चर्चाही संपुष्टात आली.
कर्णधार म्हणून धोनीने 2007 मध्ये भारताला टी -20 विश्वचषक, 2011 मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. धोनीच्या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित आहेत. यावर, भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनीने हा निर्णय अचानक का घेतला याचे कारण सांगितले आहे.
इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे धोनीला नक्कीच जाणून घ्यायचे होते. त्यानंतरच तो टी 20 विश्वचषकात खेळणार की नाही याचा आकलन करणार होता. आयपीएलला कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलले गेले. तसेच टी 20 विश्वचषक पुढे ढकलला गेले. त्यामुळे धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी जोडून राहणे योग्य वाटले नसावे. म्हणून त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असावा. जर विश्वचषक झाला असता तर धोनी नक्कीच खेळला असता.”
यावर्षी टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होता पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे आता हा विश्वचषक 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच आयसीसीने जाहीर केले की, 2021 मध्ये आधीच ठरल्याप्रमाणे भारतात टी 20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर 2022 चा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होईल.
ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी होणारा टी20 विश्वचषक कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलल्याने आयपीएल 2020 चा मार्ग मोकळा झाला. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत हे आयोजन केले जाईल. एमएस धोनी या काळात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून खेळताना दिसेल. त्याच्या नेतृत्वात संघाने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.