मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा जोरदार धक्का दिला. लखनऊने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. याबरोबरच त्यांनी मोठा विक्रमही केला.
लखनऊच्या नावावर मोठा विक्रम
चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ समोर २११ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. पण, या आव्हानाचा पाठलाग लखनऊ संघाने अखेरच्या षटकात तीन चेंडू राखून यशस्वी पूर्ण केला. त्यामुळे लखनऊ आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा चौथ्या क्रमांकाचा संघ ठरला आहे.
आयपीएलमध्ये (IPL 2022) सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये अव्वल क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. त्यांनी २०२० साली पंजाब किंग्सविरुद्ध २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तसेच तिसऱ्या क्रमांकावरही राजस्थान रॉयल्सचाच संघ आहे. त्यांनी २००८ साली २१५ धावांचा पाठलाग डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना यशस्वीरित्या पार केला होता.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. त्यांनी २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २१९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर आता चौथ्या क्रमांकावर लखनऊ संघ आला आहे (Highest targets successfully chased down in IPL).
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👌 👌
A mighty batting performance from @LucknowIPL to seal their maiden IPL victory. 👏 👏 #TATAIPL | #LSGvCSK
Scorecard ▶️ https://t.co/uEhq27KiBB pic.twitter.com/amLhbG4w1L
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
लखनऊने जिंकला सामना
या सामन्यात (LSG vs CSK) लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी केली. चेन्नईकडून रॉबिन उथप्पाने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच शिवम दुबेने ४९ धावा केल्या. तर मोईन अलीने ३५ धावांचे योगदान दिले. याबरोबर एमएस धोनीने ६ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २१० धावा केल्या. लखनऊ संघाकडून आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाकडून सलामीवीर क्विंटॉन डी कॉकने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तसेच एव्हिन लुईसने जोरदार फटकेबाजी करताना २३ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली. तसेच युवा आयुष बदोनीने नाबाद १९ धावा केल्या, तर कर्णधार केएल राहुलने ४० धावांची आक्रमक खेळी केली.
डी कॉक आणि राहुलने सलामीला ९९ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला होता. त्यामुळे लखनऊने ६ विकेट्स राखून १९.३ षटकात २११ धावांचा यशस्वी पाठलाग केला. चेन्नईकडून ड्वेन प्रीटोरियसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि ड्वेन ब्रावो यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. पंजाब सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…