पुणे । मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्टारकेन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने महाराष्ट्र संघातील सायकलपटूंना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले. श्री राजीव मेहता सचिव भारतीय ऑलिम्पिक संघ आणि श्री अजित पवार अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक संघ यांनी मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जायंट स्टारकेन शिष्यवृत्ती देऊन खेळाडूंना सन्मानित केले.
या कार्यक्रमाला ओंकार सिंग- सचिव- सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, विक्रम रोठे- अध्यक्ष महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन, प्रशांत खटावकर- महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर, प्रताप जाधव-सचिव महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री राजीव मेहता सचिव भारतीय ऑलिम्पिक संघ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री प्रवीण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक स्टारकेन स्पोर्ट्स यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
जायंट स्टारकेन ने २३ सायकलपटूंना शिष्यवृत्तीचे प्रदान केले. इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सायकलिंग संघाने एकाच वर्षी एमटीबी राष्ट्रीय आणि नॅशनल ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ऋतुजा सातपुते, प्रणिता सोमण, विवेक वायकर, पूजा दानोळे, सिद्धेश शर्मा या प्रमुख सायकलपटूंनी शिष्यवृत्तीचा स्वीकार केला.
श्री राजीव मेहता सचिव भारतीय ऑलिम्पिक संघ या प्रसंगी बोलताना म्हणाले, ” मला आज याठिकाणी उपस्थित राहून जायंट स्टारकेन शिष्यवृत्ती महाराष्ट्र संघातील खेळाडूंना प्रदान करण्यात अत्यन्त आनंद होत आहे. या सर्व खेळाडूंनी विविध राष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून महाराष्ट्राची आणि देशाची मान उंचावली आहे. मी विजेत्या सायकलपटूंचे आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अभिनंदन करतो.
भारतीय ऑलिम्पिक संघ देशातील खेळाडूंच्या कायमच पाठीशी उभा आहे आणि भविष्यात देखील या सायकलपटूंना काही मदत लागल्यास ती करण्यास नेहमीच तयार असेल. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला एका गोष्टीची जाणीव झाली कि आपल्या देशात गुणवत्ता आणि प्रतिभा असलेले खूप खेळाडू आहेत फक्त त्यांना शोधून योग्य मार्गदर्शन करण्याची आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन आणि स्टारकेन यांनी हे दाखवून दिले आहे कि जर दोन संघटना एकत्र आल्या तर काय घडू शकते.”
श्री अजित पवार अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक संघ या प्रसंगी बोलताना म्हणाले कि, ” सर्वप्रथम मला सर्व सायकलपटूंचे अभिनंदन करायचे आहे ज्यांनी विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. मला स्टारकेन स्पोर्ट्स आणि श्री प्रवीण पाटील यांचे देखील आभार व्यक्त करायचे आहे कारण त्यांनी आज जो हा उपक्रम हाती घेतला आहे तसेच उपक्रम विविध संघटनांनी हाती घ्यावेत आणि खेळाला आणि सायकलिंग या क्रीडा प्रकाराला पाठिंबा द्यावा. आजची शिष्यवृत्ती हि या खेळाडूंना भविष्यात देखील उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देईल. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघाचा अध्यक्ष या नात्याने हे सांगू इच्छितो कि आम्ही देखील महाराष्ट्रातील सायकलपटुंच्या पाठीशी आहोत आणि भविष्यात जर कोणतीही मदत संघाला लागली तर ती करण्यास सदैव तत्पर आहोत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा.”
श्री प्रवीण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक स्टारकेन स्पोर्ट्स या प्रसंगी बोलताना म्हणाले कि, ” आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि आमच्या स्टारकेन परिवारासाठी अत्यन्त आनंदाचा दिवस आहे. आपल्या सायकलपटूंची विविध स्पर्धांतील कामगिरी पाहून मला खात्री वाटते कि त्यांचे भविष्य उज्वल आहे. स्टारकेन मध्ये आमचे उद्देश्य केवळ सायकल विकणे हे नसून सायकलिंग ह्या क्रीडाप्रकाराला चालना देणे आणि सायकलिंगचा प्रसार करणे हे आहे. मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचा आभारी आहे आणि भविष्यात देखील आम्ही महाराष्ट्र सायकलिंगच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि त्यांना सर्वोपरी मदत करू हे आश्वासन देतो.”
ओंकार सिंग- सचिव- सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया,” मी सर्वप्रथम सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करतो आणि इतर कंपन्यांना आवाहन करू इच्छितो कि स्टारकेन स्पोर्ट्स प्रमाणेच त्यांनी देखील खेळाच्या प्रसारासाठी पुढे यावे आणि विविध क्रीडा संघटनांसोबत काम करावे. एकत्रित प्रयत्न केल्यास भविष्यात देखील विविध आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला संघ उत्तम कामगिरी करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया हि सायकलिंगला लागणारी मदत करण्यास आणि या खेळाचा प्रसार करण्यास कटिबद्ध आहे.”