पुणे । महाराष्ट्र आणि मुंबई संघाने मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आणि मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होत असलेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर शनिवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे गौरव दीक्षित, जागतिक मिनी फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल शिरगावकर, मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे यांच्या हस्ते झाले.
या वेळी मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह शिवानी खांडेकर, महाराष्ट्र राज्य मिनी फुटबॉल असोसिएशनचे सचिव तकदीर सय्यद आदी उपस्थित होते.
मे मध्ये स्पेन येथे होणाऱ्या जागतिक मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत शनिवारी १४ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने सलामीच्या लढतीत आंध्र प्रदेश संघावर ४-२ने विजय मिळवला. यात महाराष्ट्राकडून तहा (२ मि.), नबील (५ मि.), हर्षद (१५ मि.), कुश (२५ मि.) यांनी गोल केले.
आंध्र प्रदेशकडून ए. रेड्डी (१३ मि.), पी. राव (२२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. यानंतर मुंबई संघाने विदर्भावर ३-०ने मात केली. मुंबईकडून अंगद (३ मि.), मानस (९ मि.), पार्थ (१२ मि.) यांनी गोल केले. यानंतर मुंबईने कर्नाटकाला २-१ ने मात केली.
बेंगलुरुने गुजरातवर २-० ने विजय मिळविला. यात बेंगलुरुकडून एम.डी. जयांक (८मि.) आयुष (१७ मि.) यांनी गोल केले.