हल्दवानी: महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वोट्रपोलोमधील आपली विजयी घोडदौड कायम राखत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या महिला संघाने कर्नाटकविरुद्ध पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत विजय मिळविला, तर पुरुष संघाने प. बंगालला सहज पाणी पाजत रुबाबात फायनल गाठली. आता सुवर्णपदकाच्या लढतीत महाराष्ट्रापुढे महिला गटात केरळचे, तर पुरुष गटात सेनादलाचे आव्हान असेल.
इंदिरा गांधी स्टेडियममधील जलतरण तलावात ही स्पर्धा सुरू आहे. महिला गटात महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील लढत अतिशय थरारक झाली. एक एक गोलसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात 12-12 अशी गोलबरोबरी झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुलींनी पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-0 गोल फरकाने बाजी मारत सुवर्ण पदकाची लढत निश्चित केली. महाराष्ट्राकडून पूजा कुमारी हिने सर्वाधिक 5 गोल केले. राजश्री गुगळे व कोमल किरवे यांनी 2-2 गोल केले. नंदिनी मेनकर, निम शुक्ला व तन्वी मुळे यांनी प्रत्येकी एक गोल केला. कर्नाटककडून रोशिनी सरवानंन हिने 5, तर डिके धरूथी व तन्वी रवी यांनी 2-2 गोल करीत महाराष्ट्राला कडवी लढत दिली. दुसऱ्या उपांत्य लढतीत केरळने बंगालचा 15-9 गोल्फ फरकाने पराभव केला.
पुरुष गटात महाराष्ट्राने प. बंगालला 20-5 गोल्फ गोल फरकाने पाणी पाजून सुवर्णपदकाची लढत निश्चित केली. महाराष्ट्राकडून अश्विनीकुमार कुंडे व सारंग वैद्य यांनी 4-4 गोल करत प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ केले. भूषण पाटील व गौरव महाजनी यांनी 3-3 गोल केले, तर ऋतुराज बिडकर व अक्षयकुमार कुंडे यांनी 2-2 गोल केले. याचबरोबर उदय उत्तेकर व पीयूष सुर्यवंशी यांनीही प्रत्येकी एक गोल केला. बंगालकडून कार्तिक दास, सोमण मोंडल यांनी 2-2 गोल केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत सेनादलाने केरळचा 14-11 गोल फरकाने पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
तिरंदाजीत महाराष्ट्राला सुवर्ण चौकाराची संधी!
ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुजाळला सुवर्ण
किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, घरात बोलावून दिला ऑटोग्राफ!