डेहराडून: महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या 23 वर्षीय खेळाडूने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली.
राजगुरुनगर तालुक्यातील पिंपरी या गावचा खेळाडू वैष्णव ठाकूर याने पुरुषांच्या 102 किलो वजनी गटातील स्नॅचमध्ये 160 किलो वजन उचलले आणि गत वेळी जगदीश विश्वकर्मा याने नोंदविलेला 157 किलोचा विक्रम मोडला. स्नॅचमध्ये वैष्णवने आघाडी घेतली होती. मात्र, क्लीन व जर्कमध्ये त्याला 175 किलो वजन उचलता आले. एकूण त्याने 335 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. विश्वकर्मा याने येथे स्नॅचमध्ये 152 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 193 किलो असे एकूण 345 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
वैष्णव हा वडगाव मावळ येथे ज्येष्ठ प्रशिक्षक अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 5 वर्षे प्रशिक्षण घेत आहे. गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अगोदर गुडघ्याची शीर तुटल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. त्यानंतर गेले 3 महिने त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. आजपर्यंत त्याने वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटात मिळून 4 सुवर्णपदकांसह 7 पदके जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही त्याने सोनेरी कामगिरी केली होती. त्याचे वडील शेतकरी असून, वैष्णव हा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्क्वॅशमध्ये डबल धमाका, महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य
राही सरनोबतचे सोनेरी पुनरागमन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; धिर्ती अहिरवालला जलतरणात सुवर्णपदक