श्रमिक जिमखाना मैदानावर पार पडलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात महिंद्रा अँड महिंद्रा तर महिला विभागात शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद पटाकवले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या आनंद पाटील व सोनाली शिंगटे यांना मालिकवीर (एलईडी टेलिव्हिजन) पुरस्काराने गौरविण्यात आले.
महिला विभागात शिवशक्ती विरुद्ध राजमाता जिजाऊ यांच्यात अंतिम सामना रंगला. सुरुवातीपासून सामना दोन्ही संघानी बचावात्मक खेळ केला. मध्यंतरा पर्यत १०-१० असा सामना बरोबरीत होता. मध्यंतराला दोन्ही संघानी ७-७ पकडी केल्या होत्या.
मध्यंतरा नंतर मात्र शिवशक्ती संघाच्या सोनाली शिंगटेने चढाईत उत्कृष्ट खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर पकडीमध्ये रेखा सावंत व पौर्णिमा जेधे यांनी प्रत्येकी ६-६ पकडी केल्या. पुणे कडून चढाईत सायली केरीपले व नेहा घाडगे यांनी बऱ्यापैकी खेळ केला पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याना अपयश आले. पायल घेवारे ने ५ तर सायली केरीपले ने ३ पकडी केल्या. शिवशक्ती संघाने ३२-१७ असा विजय मिळवत मुंबई महापौर चषक पटकवला.
पुरुष विभागात अंत्यत चुरशीचा अंतिम सामना झाला. सुरुवातीला मध्य रेल्वे कडे असताना सामन्याच्या ६ व्या मिनिटाला ऋतुराज कोरवी एकटाच असताना चढाईत बोनस व ४ गडी बाद करून लोन वाचवला. १२ व्या मिनिट पर्यत महिंद्रा ने दुसरा लोन टाकत २१-०७ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा पर्यत २५-११ आघाडी महिंद्रा संघाकडे होती.
उत्तरार्धात मध्य रेल्वेने आक्रमक खेळ करत महिंद्रा वर लोन टाकला. सामना संपायला शेवटची २० सेकंद बाकी असताना महिंद्रा अँड महिंद्रा चढाईत ऋतुराज कोरवी हा एकटाच मैदानात होता, महिंद्रा अँड महिंद्रा कडे ३५-३२ अशी फक्त ३ गुणांचीच आघाडी असल्यामुळे ऋतुराज कोरवीची यशस्वी पकड करून ३ गुण मिळवून सामना ५-५ चढाईत नेण्याची चांगली संधी सेंट्रल रेल्वेकडे होती परंतु क्षणाक्षणाला वाढणाऱ्या दडपणावर मात करत ऋतुराज कोरवीने शेवटच्या चढाईत ३ गुण मिळवून सेंट्रल रेल्वे वर ३८-३२ असा विजय मिळवला.
चढाईत महिंद्रा कडून आनंद पाटील ने १० गुण तर ऋतुराज कोरवीने ९ गुण मिळवले. पकडी मध्ये शेखर तटकरे व सचिन शिंगांडे यांनी चांगला खेळ केला. मध्य रेल्वे कडून विनोद अत्यालकर ने चढाईत १४ गुण मिळवले. तर सुरज बनसोडे व श्री भारती यांनी चांगला खेळ केला.
संक्षिप्त निकाल
महिला विभाग:
१) शिवशक्ती महिला संघ, मुंबई
२) राजमाता जिजाऊ, पुणे
३) सुवर्ण युग, पुणे
४) महात्मा गांधी स्पो, उपनगर
उत्कृष्ट चढाईपटू: सायली केरीपाले (राजमाता जिजाऊ)
उत्कृष्ट पकडपटू: पायल घेवारे (राजमाता जिजाऊ)
मालिकावीर: सोनाली शिंगटे (शिवशक्ती)
पुरुष विभाग:
१) महिंद्रा अँड महिंद्रा
२) मध्य रेल्वे
३) देना बँक
४) मुंबई बंदर
उत्कृष्ट चढाईपटू: नितीन देशमुख (देना बँक)
उत्कृष्ट पकडपटू: परेश चव्हाण (मध्य रेल्वे)
मालिकावीर: आनंद पाटील (महिंद्रा अँड महिंद्रा)