पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं इतिहास रचला आहे. ती टेबिल टेनिसच्या राउंड ऑफ 16 मध्ये पोहचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
सोमवारी (29 जुलै) उशीरा राउंड ऑफ 32 मध्ये मनिकाचा सामना फ्रान्सची भारतीय वंशाची खेळाडू पृथिका पवाड हिच्याशी झाला. मनिकानं हा सामना क्लिन स्विप केला आहे. यासह तिनं राउंड ऑफ 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. मनिका बत्रा ऑलिम्पिकच्या राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू आहे. विशेष म्हणजे, मनिका जागतिक रँकिंगमध्ये 28व्या स्थानावर असून पृथिका तिच्यापेक्षा 10 स्थान पुढे आहे.
पहिल्या गेममध्ये मनिका 2 गुणांनी मागे होती. मात्र तिनं शानदार कमबॅक करत गेम 11-9 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मनिकानं सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करत 11-6 ने आरामात विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पृथिकानं थोडाफार संघर्ष केला, मात्र मनिकानं हा गेम 11-9 ने आपल्या नावे केला. मनिकानं चौथा गेम 11-7 असा जिंकत सामना 11-9, 11-6,11-9, 11-7 असा सरळ गेममध्ये जिंकला.
यापूर्वी टेबल टेनिसमध्ये कोणताही भारतीय खेळाडू राउंड ऑफ 32 च्या पुढे जाऊ शकला नव्हता. मनिकानं हा रेकॉर्ड मोडला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये शरथ कमल पुरुष एकेरीत राउंड ऑफ 32 मध्ये पोहचला होता. आता राउंड ऑफ 16 मध्ये मनिकाचा सामना जपानची हिरोनो मियू आणि हाँगकाँगची झू चेंगझू यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रा पदकाची दावेदार आहे, मात्र पदक जिंकण्यासाठी तिला नॉकआऊट सामन्यांमध्येही अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोना व्हायरसची एंट्री, पदक जिंकल्यानंतर खेळाडू आढळला कोविड पॉझिटिव्ह
गुलाबी साडी घालून नीता अंबानींचा पॅरिसमध्ये जबरदस्त भांगडा, व्हिडिओ तुफान व्हायरल
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल