सध्या आयपीएलचा (IPL 2025) 18वा हंगाम सुरू आहे. यामध्ये सर्व संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा विजयी मार्गावर आला आहे, पण संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकामागून एका सामन्यात फ्लॉप होत आहे. त्यामुळे रोहित शर्मावर टीका होत आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने तर म्हटले आहे की त्याचा वेळ संपला आहे, पण मुंबई व्यवस्थापनाला अजूनही माजी कर्णधारावर विश्वास आहे.
शेवटच्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा धुव्वा उडवला. या विजयानंतर, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाउचरचा असा विश्वास आहे की, रोहित शर्मा लवकरच मोठी धावसंख्या उभारेल. तो म्हणतो की रोहित आता सामना जिंकणाऱ्या शैलीत फलंदाजी करत आहे. वानखेडे स्टेडियमवर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने 16 चेंडूत 26 धावा केल्या आणि 3 शानदार षटकार मारले. तो लांब खेळी खेळण्याच्या मनःस्थितीत होता हे स्पष्ट होते. पण तो पॅट कमिन्सच्या चेंडूवर झेलबाद झाला आणि पॉवरप्लेमध्येच तंबूत परतला. शेवटी, मुंबई इंडियन्सने 19व्या षटकात सामना जिंकत सलग दुसरा विजय नोंदवला.
मार्क बाउचरने जिओहॉटस्टारवर म्हटले की, “रोहितने गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या जुन्या शैलीतील मोठे षटकार पाहायला मिळाले. त्याचा दृष्टिकोन खूप चांगला होता, तो गोलंदाजांवर दबाव आणून धावा करण्याच्या संधी निर्माण करत आहे. तो सध्या सुमारे 30 धावा करतोय आणि लवकरच एक मोठी खेळी पाहायला मिळू शकते. तो पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये येईल असल्याचे दिसते.”
पुढे मार्क बाउचर म्हणाले, “हार्दिक पांड्या हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा तो चांगला खेळतो तेव्हा संघ जिंकतो. मला त्याची गोलंदाजीतील नवीन भूमिका आवडली आहे. आता तो केवळ पॉवर प्लेमध्येच नाही तर कठीण मधल्या षटकांमध्येही गोलंदाजी करत आहे आणि विकेट्स घेत आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे, जो त्याच्या फलंदाजीतूनही दिसून येतो, जिथे तो सामने पूर्ण करत आहे.