भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला शुक्रवार(15 जानेवारी) पासून ब्रिस्बेन येथे द गाबा स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच मार्नस लॅब्यूशानेने दमदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत पोहचले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने 87 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी गमावून 274 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मार्नस लॅब्यूशानेने 108 धावांची खेळी करताना डॉन ब्रॅडमॅनचा विक्रम मोडत त्याला मागे टाकले.
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये डाव्या हाताचा फलंदाज मार्नस लॅब्यूशानेने 204 चेंडूचा सामना करताना 9 चौकारांच्या मदतीने 108 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याचबरोबर ही खेळी करताना त्याने डॉन ब्रॅडमॅनचा विक्रम मोडत काढला.
त्यामुळे लॅब्यूशेनने गाबाच्या मैदानात पहिल्या तीन डावात सर्वाधिक धावा काढल्या आहेत. त्याने पहिल्या 3 डावात सर्वाधिक 339 धावा काढल्या आहेत. या अगोदर हा विक्रम डॉन ब्रॅडमॅनच्या नावावर होता. त्याने ब्रिस्बेन येथे खेळलेल्या पहिल्या 3 डावात 326 धावा केल्या होत्या.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकला लॅब्यूशेन
लॅब्यूशेनचे हे कसोटी कारकिर्दीतील एकूण 5 वे शतक आहे. तर भारता विरुद्धचे पहिले शतक आहे. तसेच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने आत्तापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत या मालिकेत अनुक्रमे 47, 6, 48, 28, 91, 73 आणि 108 धावांची खेळी साकारली आहे.
विशेष म्हणजे ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असल्याने त्याने या स्पर्धेतही 75 च्या सरासरीने सर्वाधिक 1600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 5 शतके ठोकली आहेत.
दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या 274 धावा –
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर 87 षटकांत 5 गडी गमावून 274 धावा धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो या सामन्यात फक्त 1(4) धावेवर बाद झाला. मार्क्स हॅरिस 5(23)धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात जरी खराब झाली असली तरी मार्नस लॅब्यूशेनने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी करून ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सावरला. त्यांनंतर स्टीव्ह स्मिथने 77 चेंडूचा सामना करताना 36 धावा केल्या. मॅथ्यू वेड याने 87 चेंडूत 45 धावा केल्या. त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन हे दोघे अनुक्रमे 28 आणि 38 धावांवर खेळत आहेत.
भारतीय संघाकडून टी नटराजन यांनी सर्वाधिक 2 गडी बाद केले. या बदल्यात त्याने 20 षटकांत 63 धावा दिल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या –
कमाल! भुवनेश्वर कुमारनंतर ‘असा’ पराक्रम करणारा टी नटराजन दुसराच भारतीय
Video : आणखी दुखापती नको रे बाबा! रोहित पृथ्वी शॉमुळे जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला
काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला ‘हा’ अनोखा विक्रम