ऑस्ट्रेलिया संंघाचा माजी फलंदाज मायकल हसीने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा रिकी पाँटिंगपेक्षाही उत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. हसीने यूट्यूब चॅनेलवर रौनक कपूरबरोबर बोलताना म्हटले की, धोनी कोणताही सामना समजून घेणे आणि रणनीती बनविण्यात पाँटिंगपेक्षा खूप चांगला आहे. धोनी कधीच युवा खेळाडूंवर दबाव येऊ देत नाही.
हसी म्हणाला की, “धोनी (MS Dhoni) खूप शांत आणि खूप समजूतदार आहे. माझ्या मते तो रणनीतीच्या बाबतीत पाँटिंगपेक्षा (Ricky Ponting) सामना खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो. पाँटिंगची रणनीतीदेखील चांगली असते. परंतु मैदानावर धोनी काही पाऊले पुढे जाऊन जे निर्णय घेतो, ते पाहून मी विचारात पडतो की, ही सर्व रणनीती तो आणतो तरी कुठून?”
“निश्चितच धोनीची रणनीती काम करू शकते. ही कशी येते? तर ती त्याच्यातील अनुभवामुळे. दोन वेगवेगळे कर्णधार, परंतु दोन्हीही आपापल्या पद्धतीने प्रभावी आहेत,” असेही हसी (Michael Hussey) यावेळी म्हणाला.
“माझा असा विश्वास आहे की, धोनीची महानता सर्वांपेक्षा जरा वेगळीच आहे. त्याच्याकडे एक खास क्षमता आहे की भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटला एका धर्माप्रमाणे मानले जाते, तिथे तो युवा खेळाडूंवर दबाव येऊ देत नाही. धोनीचे असे मत आहे की, हा केवळ एक खेळ आहे. त्यामुळे मैदानावर जा आणि केवळ खेळाचा आनंद लूटा,” असे युवा खेळाडूंबद्दल बोलताना हसी म्हणाला.
“काही दिवस तुम्ही जिंकता तर काही वेळा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो. जीवनात केवळ हेच सर्वकाही नसते. हे सर्व एका कर्णधारासाठी खूप कठीण असते, विशेषत: भारतात,” असेही हसी पुढे म्हणाला.
हसी ऑस्ट्रेलिया संघात पाँटिंग आणि आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.
हसीने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत ७९ कसोटी सामने, १८५ वनडे सामने आणि ३८ आंंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५१.५२ च्या सरासरीने ६२३५ धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने ४८.१५ च्या सरासरीने ५४४२ धावा केल्या आहेत. तसेच टी२०त ३७.९४ च्या सरासरीने ७२१ धावा केल्या आहेत.