भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सध्याच्या भारतीय संघात त्याच्यासारखा किंवा युवराज सिंगसारखा एकही क्षेत्ररक्षक नसल्याचे सांगितले आहे. कैफला एका मुलाखतीत त्याच्या काळातील आणि सध्याच्या भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या तुलनेबद्दल प्रश्न विचारला होता. यावर त्याने सध्याच्या भारतीय संघातील कमतरतेवर बोट ठेवले.
त्या काळात युवराज पॉईंट आणि कैफ एक्स्ट्रा कव्हरवर उभे राहत होते. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या फलंदाजी कौशल्याबरोबरच क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले होते.
कैफने (Mohammad Kaif) ‘स्पोर्टस्क्रीन’ या यूट्यूब चॅनेलशी बोलताना म्हटले की, “संपूर्ण क्षेत्ररक्षक बनण्यासाठी तुम्हाला झेल घेण्यात उत्कृष्ट व्हावे लागते. तुमचा निशाना योग्यच असला पाहिजे. तसेच तुम्ही वेगाने धावण्यात सक्षम असायला पाहिजे आणि वेगाने जाणाऱ्या चेंडूला पकडण्याचे तंत्रदेखील तुमच्याकडे असले पाहिजे.”
“जेव्हा आम्ही खेळायचो, तेव्हा मी आणि युवराजने क्षेत्ररक्षणानेदेखील आपला ठसा उमटवला. आज तुम्हाला भारतीय संघात अनेक चांगले क्षेत्ररक्षक मिळतील परंतु मला नाही वाटत की, तुम्हाला असे खेळाडू पहायला मिळतील जे क्षेत्ररक्षक म्हणून ‘संपूर्ण पॅकेज’ आहेत,” असेही कैफ पुढे म्हणाला.
“एक खेळाडू जो स्लिपमध्ये झेल झेलू शकतो, तो शॉर्ट लेगवरही झेल घेऊ शकतो. याबरोबरच तो धावण्यामध्ये उत्कृष्ट असेल तसेच लाँग ऑन बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करू शकेल, असा खेळाडूची मला सध्याच्या भारतीय संघात कमतरता जाणवते,” असेही क्षेत्ररक्षक खेळाडूचे वर्णन करताना कैफ म्हणाला.
कैफने रविंद्र जडेजाबद्दल (Ravindra Jadeja) बोलताना पुढे म्हटले की, “जडेजा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. खरंतर तो वाढत्या वयाबरोबर उत्कृष्ट होत आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा होत आहे. परंतु भारताचा क्षेत्ररक्षण विभाग थोडा कमकुवत आहे.”
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांपैकी सर्वोत्तम कोण?, याबद्दल कैफ म्हणाला की, “जर हे दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून खेळत असतील तर मला रोहितला पहायला आवडेल. जर कोणत्या शहरात दोघेही एकत्र २ सामने खेळत असतील तसेच एका संघात विराट आणि दुसऱ्या संघात रोहित खेळत असेल, तर मी तो सामना पहायला जाईल. ज्या सामन्यात रोहित खेळत असेल.”
“विराटने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट विक्रम केले आहेत. परंतु रोहितच्या फलंदाजीमध्ये कलात्मकता आहे. तो असा फलंदाज आहे जो चेंडूंची धुलाई करतो आणि गोलंदाजाला याची जाणीवही होऊ देत नाही,” असेही रोहितची प्रशंसा करताना कैफ म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा जडेजाने महिला क्रिकेटपटूला भेटायला बोलावले होते स्विमिंगपुलवर, चॅटींग झाले होते व्हायरल
-भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कोचने केली होती स्कर्ट घालून फलंदाजी
-८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी