भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, मात्र शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.
दरम्यान, चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही शमीला संघात स्थान मिळणार नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. टी20 मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होईल. मालिकेतील अखेरचा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत खेळला जाईल.
यानंतर दोन्ही संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील. मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीसाठी टीम इंडियासाठी ही शेवटची संधी असेल. या एकदिवसीय मालिकेद्वारे मोहम्मद शमी नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना पूर्ण आशा होती. पण हे आता शक्य होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमी अद्याप पूर्ण फिटनेस परत मिळवू शकलेला नाही. या कारणामुळे त्याची संघात निवड होणार नाही. शमीच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगला वनडे संघात स्थान मिळू शकतं.
यापूर्वी मोहम्मद शमी भारत आणि न्यूझीलंड मालिकेद्वारे संघात परतेल अशी अपेक्षा होती. परंतु तो आपली फिटनेस मिळवू न शकल्यामुळे त्याला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपर्यंत शमी नक्कीच तंदुरुस्त होईल असं वाटत होतं. पण पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. आता इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका हुकल्यानंतर शमी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी मोठा क्षण! इतिहासातील पहिली कसोटी मालिका जिंकली
मुंबईच्या 17 वर्षीय खेळाडूचा धमाका! अवघ्या 67 चेंडूत ठोकलं शतक
आता कसोटी क्रिकेट नव्या पद्धतीनं खेळलं जाणार, बदलू शकतात अनेक नियम!