जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज चेतेश्वर पुजाराने त्याची पहिली धाव घेण्यासाठी ५४ चेंडू घेतले. विशेष म्हणजे ५४ चेंडूंतच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१५-१६ मध्ये क्राइस्टचर्च येथे कसोटीतील सर्वात जलद शतक केले होते.
सर्वात जलद शतक करण्याच्या यादीत विंडीजचे महान माजी कर्णधार विव रिचर्डस हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंग्लंड विरुद्ध ५६ चेंडूत शतक केले होते.
याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये पहिली धाव घेण्यासाठी सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉन मरे यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९६३ साली सिडनीमध्ये पहिली धाव घेण्यासाठी ८० चेंडू खेळले होते.
आज पुजारा के एल राहुल बाद झाल्यावर पहिल्या डावाच्या चौथ्या षटकातच तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. तेव्हापासून २१ वे षटक झाले तरीही पुजाराने एकही धाव काढलेली नव्हती.
त्याने या सामन्यात ५३ चेंडू खेळले आणि एकही धाव काढलेली नाही. अखेर ५४ व्या चेंडूवर पुजाराने पहिली धाव काढली. असे करताना त्याने सचिन तेंडुलकरचाही नकोसा असा विक्रम मागे टाकला आहे. सचिनने २००२ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध दिल्लीमध्ये पहिली धाव घेण्यासाठी ४६ चेंडू खेळले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिली धाव घेण्यासाठी सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉन मरे यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९६३ साली सिडनीमध्ये पहिली धाव घेण्यासाठी ८० चेंडू खेळले होते.
पुजाराने आज खेळायला आल्यापासून ८० व्या मिनिटाला पहिली धाव घेतली. भारताकडून पहिली धाव काढण्यासाठी सर्वात जास्त वेळ घेण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. त्यांनी पहिली धाव घेण्यासाठी १९९२ साली जोहान्सबर्ग मध्येच ८९ मिनिटे घेतली होती.