धरमशाला। कर्नाटक विरुद्ध भारत ब संघात आज देवधर ट्रॉफी २०१८ चा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात कर्नाटकडून रवीकुमार समर्थने शतकी खेळी करताना एक खास विक्रम केला आहे.
तो यावर्षी देवधर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या स्पर्धेत खेळताना तीन सामन्यात मिळून ३०९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या दोन शतकांचा आणि एका अर्धशतकाच्या समावेश आहे.
याबरोबरच देवधर ट्रॉफीमध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रवीकुमार समर्थ तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे.
समर्थला रैनाची बरोबरी करण्याची किंवा त्याला मागे टाकण्याची संधी होती. रैनाच्या ३१० धावांची बरोबरी करण्यासाठी समर्थला फक्त १ धावेची गरज होती. मात्र त्याला धर्मेंद्र जडेजाने बाद केल्याने त्याची ही संधी हुकली आहे.
समर्थने आज १२० चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १०७ धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघासमोर विजयासाठी ५० षटकात २८० धावांचे आव्हान ठेवले आहे.
देवधर ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विनोद कांबळी – ३३० धावा – (१९९९/००)
सुरेश रैना – ३१० धावा (२००४/०५)
रवीकुमार समर्थ – ३०९ धावा (२०१७/१८)
अजय शर्मा – ३०० धावा (१९९७/९८)