इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा श्रीगणेशा झाला आहे. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले आहे. त्यामुळे बुमराह घरच्या मैदानावर कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळत आहे.
या २७ वर्षीय गोलंदाजाने जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर बुमराहने एकूण १७ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु यातील सर्व सामने परदेशात झाल्याने त्याला मायभूमीत एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
बुमराहप्रमाणे जवागल श्रीनाथ, आरपी सिंग, सचिन तेंडूलकर आणि आशिष नेहरा या भारतीय दिग्गजांनी घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्यापुर्वी परदेशात सर्वाधिक सामने खेळले होते. श्रीनाथ यांनी स्वदेशात पहिला कसोटी सामना खेळण्यापुर्वी बाहेरील मैदानावर एकूण १२ सामने खेळले होते. तर आरपी सिंगने ११ सामने खेळले होते. तसेच तेंडूलकर आणि नेहरा यांनी प्रत्येकी ११ सामन्यानंतर भारतात कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती.
हेच जर, क्रिकेटजगतातील सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंबद्दल पाहायचे झाले तर, वेस्ट इंडिजचे दिग्गज डॅरेन गंगा हे बुमराहच्या बरोबरीवर आहेत. डॅरेन यांनीही वेस्ट इंडिजच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्यापुर्वी परदेशात एकूण १७ सामने खेळले होते. तसेच इंग्लंडचे क्रिकेटपटू बर्ट स्ट्रुडविक (१५ सामने) , बिली बेट्स (१५ सामने) आणि फेड्रिक फेन (१४ सामने) यांनाही घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG Test Live : इंग्लंडने जिंकली नाणेफेक; ‘या’ खेळाडूंना मिळाली ११ जणांच्या संघात संधी
चेन्नई कसोटीपुर्वी सचिनचा इंग्लंडला मदतीचा हात, सांगितला भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा उपाय
भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना जो रुटसाठी ठरणार खास, कारणही आहे तसंच विशेष