चेन्नई। शुक्रवारी आयपीएल 2019 मध्ये 44 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने 46 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याला चेन्नईचा नियमित कर्णधार एमएस धोनीला ताप आल्याने मुकला होता.
त्यामुळे धोनी या सामन्यात न खेळल्याने मुंबईला फायदा झाल्याचे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मान्य केले आहे.
रोहित सामन्यानंतर म्हणाला, ‘धोनी आजूबाजूला नसणे ही मोठी गोष्ट होती. कारण त्याची उपस्थिती त्यांच्या संघासाठी खूप काही करते. धावांचा पाठलाग करताना त्यांच्याकडे धोनी नसल्याने त्यांच्यासाठी कठीण गेले.’
रोहित पुढे म्हणाला, ‘मला खात्री आहे की चेन्नईला धोनीची कमी भासली असेल. पण तो आजारी असल्याने त्याच्या हातात काही नव्हते.’
तसेच रोहित म्हणाला नाणेफेक हरण्याबद्दल म्हणाला, ‘नाणेफेक हरणे चांगले होते, कारण आम्हीही प्रथम क्षेत्ररक्षण निवडले असते. पण आम्हाला माहित आहे की फलंदाजी किंवा गोलंदाजी काहीही आधी केले तरी आम्हाला चांगले क्रिकेट खेळणे महत्त्वाचे होते. आम्ही त्याबद्दल सामन्याआधी बोललो होतो. पण आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. इथे येऊन खेळणे सोपे नव्हते.’
रोहितने या सामन्यात 48 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे या आयपीएल मोसमातील पहिलेच अर्धशतक होते. तसेच त्याला त्याच्या या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
त्याच्या खेळीबद्दल रोहित म्हणाला, ‘ही समाधानकारक खेळी होती. मी 30 ते 40 धावा करत होतो पण अर्धशतक होत नव्हते. मला माझ्या फॉर्मची चिंता नव्हती. कारण मी चांगले खेळत होतो. मला माहीत होते एक दिवस येईल आणि आज तो दिवस आला.’
या सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाने चेन्नईचे कर्णधारपद सांभाळले होते. सामन्यानंतर चेन्नईच्या पराभवाचे कारण सांगताना तो म्हणाला, चेन्नईच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. तसेच तो म्हणाला, फलंदाजांनी जबाबदारीने खेळायला हवे होते.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 155 धावा केल्या होत्या. त्यानंतर 156 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव 17.4 षटकातच 109 धावांवर संपुष्टात आला.
गोलंदाजीत मुंबईकडून लसिथ मलिंगाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कुणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 आणि हार्दिक पंड्या आणि अनुकुल रॉयने प्रत्येकी 1 विकेट घेतली. चेन्नईकडून मिशेल सँटेनरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच इम्रान ताहिर आणि दिपक चहरने एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत पाचव्यांदाच घडली अशी गोष्ट
–हार्दिक पंड्या पाठोपाठ १७ वर्षीय रियान परागनेही मारला हॅलिकॉप्टर शॉट, पहा व्हिडिओ
–१९ वर्षांपूर्वी वडीलांना तर आता मुलाला यष्टीरक्षक धोनीने केले बाद