हैदराबाद । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीची शुक्रवारी येथील जी. एम. सी. बालयोगी स्टेडियमवर हैदराबाद एफसीविरुद्ध लढत होईल. निर्णायक टप्यात काहीसा पिछाडीवर पडलेला मुंबई सिटी बाद फेरीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भक्कम खेळ करेल.
जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा मुंबई 13 सामन्यांतून 19 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ओदीशाच्या तुलनेत एक सामना त्यांच्या हातात आहे. तळातील हैदराबादविरुद्ध जिंकल्यास ते चौथे स्थान गाठू शकतात.
हैदराबादला दहा सामन्यांत एकही विजय मिळविता आलेला नाही. त्यातच गेल्या चार सामन्यांत ते हरले आहेत. एकूण गुणांच्या बाबतीत आयएसएलमधील सर्वांत अपयशी संघ बनण्याची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना अखेरच्या पाच सामन्यांतून पाच गुणांची गरज आहे.
मुंबईसाठी मोसम चढ-उतारांचा ठरला आहे. अलिकडच्या सामन्यांत त्यांचे सातत्य कमी झाले आहे. मागील लढतीत मात्र त्यांनी गतविजेत्या बेंगळुरू एफसीला 2-0 असे हरविले. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असले पाहिजे. बाहेरील सामन्यांत त्यांची कामगिरी यंदाच्या मोसमात सर्वोत्तम आहे. सात सामन्यांत 12 गुण मिळविताना त्यांचा एकच पराभव झाला आहे.
कोस्टा यांनी सांगितले की, हा सामना आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आम्हाला चुका करून चालणार नाही याची कल्पना आहे. त्यामुळे आम्हाला खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल. कसून सराव करावा लागेल आणि हैदराबादच्या क्षमतेची जाणीव ठेवावी लागेल.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही गुणतक्ता पाहिले तर हैदराबाद तळात दिसतो, पण त्यांचे सामने पाहिले तर अखेरपर्यंत ते झुंज देतात हे लक्षात येईल. त्यांच्याकडे फार चांगले खेळाडू आहेत. त्यांचे परदेशी खेळाडू सुद्धा उत्तम आहेत. त्यांच्याकडे बऱ्याच समस्या असतील याची मला खात्री असली तरी अखेरीस आम्हाला हा सामना जिंकायचा आहे.
हैदराबाद आणि मुंबईला यंदा बरेच गोल पत्करावे लागले आहेत. हैदराबादला सर्वाधिक 31 गोल पत्करावे लागले आहेत. या बाबतीत 21 गोल पत्करलेल्या मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. या लढतीत गोल होण्याची अपेक्षा बाळगता येईल. मोडोऊ सौगौ याने मागील चार सामन्यांत तीन गोल करीत फॉर्म कमावला आहे. मुंबई निर्णायक विजयाचे तीन गुण कमावण्याच्या निर्धाराने खेळेल.
हैदराबादचे हंगामी मुख्य प्रशिक्षक जेव्हीयर गुर्री लोपेझ यांनी सांगितले की, मी संघाची सर्व प्रकारची आकडेवारी बघतो आहे. आम्ही 31 गोल पत्करले आहेत. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि स्पर्धेत उच्च पातळी गाठायची असेल जी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे इतके गोल पत्करायचे नाहीत. ही समस्या बचाव फळीशी संबंधित नसून पूर्ण संघाचीच आहे. आम्ही संघटीत खेळाचा प्रयत्न करतो. आम्ही गोलरक्षकासह 11 खेळाडूंनी आक्रमण करतो आणि स्ट्रायकर्ससह 11 खेळाडू मिळून बचावही करतो.