महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या “३१व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” मुंबई उपनगरने सलग दुसऱ्यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले.
अहमदनगर येथील रेसिडेंशियल हायस्कूल येथील क्रीडांगणावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने परभणीचा ५७-२७ असा लीलया पराभव करीत “स्व. राजश्री चंदन पांडे” फिरता चषक दुसऱ्या वर्षी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. हरजितकौर सिंग भन्नाट अष्टपैलू खेळ त्याला याशिका पुजारी, समृद्धी मोहिते, स्नेहल चिंदरकर यांची मिळालेली चढाई- पकडीची भक्कम साथ यामुळे पूर्वार्धात ३ लोण देत ३४-११ अशी आघाडी घेतली. त्यावर न थांबता पुन्हा तोच जोश कायम राखत आणखी २ लोण देत हा सामना एकतर्फी केला.
परभणीच्या निकिता लंगोरे, गौरी दाहे, गीता तुरे यांना या सामन्यात सूर सापडला नाही. त्यांचा प्रतिकार आणि बचाव एवढा दुबळा होता की, परभणीला एकाही लोणची परतफेड करता आली नाही. पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत अंतिम फेरी पर्यंत धडक देणाऱ्या परभणीला शेवट गोड करणे जमले नाही. त्या उलट मुंबई उपनगरने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोशपूर्ण खेळ करीत अंतिम फेरीसह सर्वच सामने एकतर्फी जिंकत आपला दबदबा निर्माण केला.
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा प्रतिकार ४२-१९ परतवून लावत “स्व. नारायण नागो पाटील फिरत्या चषकावर” आपले नाव कोरले. ३१वर्षाच्या किशोर/किशोरी गटाच्या निवड चाचणी कबड्डीच्या इतिहासात ठाण्याने प्रथमच ही किमया साधली. या अगोदर दोन वेळा ठाण्याने अंतिम फेरीत धडक दिली होती. पण त्याचे रूपांतर विजेतेपदात त्यांना यावर्षी करता आले. आक्रमक सुरुवात करीत ठाण्याने पुण्यावर २ लोण चढवीत पहिल्या डावात २२-०९ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोच जोश कायम राखत आणखी २ लोण देत हा सामना एकतर्फी आपल्या नावे केला.
उपांत्य सामन्यात उपनगरवर विजय मिळविताना जो खेळ पुण्याने केला त्याचा लवलेश अंतिम सामन्यात कोठे आढळून आला नाही. ठाण्याने दिलेल्या चार लोणपैकी एकही लोणची पुण्याला परतफेड करता आले नाही. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रिन्सकुमार तिवारी, कौस्तुभ शिंदे यांच्या भन्नाट चढाई-पकडीच्या खेळाने ठाण्याचा विजय सोपा केला. राहुल वाघमारेची एकाकी लढत पुण्याला विजयी करण्यात कमी पडली.
या स्पर्धेचा “बक्षीस वितरण” अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, खासदार सुजय विखेपाटील, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संदेश काते, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष दादा कळमकर, महाराष्ट्र कबड्डी असो.चे उपाध्यक्ष शशिकांत गाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.